बेंगळुरू: कर्नाटकातील फ्रीडम पार्क येथे आयोजित ‘व्होट अधिकारी रॅली’मध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि इतर नेत्यांनी भाषण केले. या वेळी राहुल गांधींनी थेट निवडणूक आयोग आणि भाजपवर मतांमध्ये हेराफेरी केल्याचा गंभीर आरोप केला. दरम्यान, राहुल गांधी म्हणाले, 'जर आम्हाला इलेक्ट्रॉनिक डेटा मिळाला तर आम्ही सिद्ध करू की भाजप आणि पंतप्रधान मोदींनी गेल्या लोकसभा निवडणुकीत संविधानावर हल्ला केला. कर्नाटकातही मतांची चोरी झाली असून एक व्यक्ती, एक मत या तत्त्वावरच गदा आणली गेली.'
महाराष्ट्र आणि कर्नाटकातील उदाहरणे -
राहुल गांधींनी सांगितले की, महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत महाआघाडी जिंकली, पण चार महिन्यांनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप जिंकले. या निवडणुकीत एक कोटी नवीन मतदारांची भर पडली होती, ज्यातील अनेकांनी लोकसभा निवडणुकीत मतदानच केले नव्हते. राहुल गांधींनी आरोप केला केला की, नवीन मतदारांच्या नावांचा समावेश करून ही मते थेट भाजपच्या खात्यात गेली.
हेही वाचा - राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया ब्लॉकची महत्त्वपूर्ण बैठक; 25 पक्षांचे 50 नेते उपस्थित
महादेवपुरा मतदारसंघातील संशोधन -
राहुल गांधींनी उघड केले की, बंगळुरू मध्य लोकसभा आणि महादेवपुरा विधानसभा मतदारसंघाचा सखोल अभ्यास केला असता मोठी गडबड आढळली. महादेवपुरा मतदारसंघात 6.5 लाख मतांपैकी तब्बल 1,00,250 मते चोरी झाली. म्हणजेच दर सहा मतांपैकी एक मत भाजपच्या बाजूला वळवले गेले, असा गंभीर आरोपही राहुल गांधींनी केला.
हेही वाचा - 'लोकांचा मतदार यादीवर विश्वास नाही...'; राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर पुराव्यांसह उपस्थित केले गंभीर प्रश्न
मतदार यादी आणि व्हिडिओग्राफीवर बंदीचा आरोप
दरम्यान, राहुल गांधींचे म्हणणे आहे की, काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे मतदार यादीची सॉफ्ट कॉपी मागितली, पण ती देण्यास नकार देण्यात आला. इतकेच नव्हे तर मतदान प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करण्यासही विरोध करण्यात आला आणि आता नियमच बदलण्यात आले आहेत. तथापी, राहुल गांधींनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की ही लढाई केवळ काँग्रेस किंवा INDIA आघाडीची नाही, तर संविधान, महात्मा गांधी, नेहरू, आंबेडकर, बसवण्णा, फुले आणि नारायण गुरु यांच्या विचारांचे रक्षण करण्याची आहे.