वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे. पुढील 24 तासांत भारतावर मोठा टॅरिफ बॉम्ब टाकण्यात येणार आहे. रशियाकडून भारताने तेल खरेदी सुरू ठेवल्यास, त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा ट्रम्प यांनी एका मुलाखतीत दिला आहे. भारत युद्धयंत्रणेला इंधन पुरवत आहे. जर त्यांनी हे चालू ठेवले, तर मला आनंद होणार नाही. त्यांनी दंड भरण्यास तयार राहावे, असेही ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
1 ऑगस्टपासून 25 टक्के टॅरिफ लागू -
अमेरिकेने 1 ऑगस्ट 2025 पासून भारतावर 25 टक्के आयात शुल्क लादले आहे. भारताच्या अमेरिकेला होणाऱ्या सर्व निर्यातीवर हे टॅरिफ लागू होणार आहे. 2024 मध्ये भारताने अमेरिकेला सुमारे 87 अब्ज डॉलर्सची निर्यात केली होती, परंतु त्याच वेळी 45.7 अब्ज डॉलर्सचे व्यापार तूट अमेरिकेला सहन करावी लागली होती.
हेही वाचा - डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का! भारत रशियाकडून तेल खरेदी थांबवणार नाही
भारतावर काय परिणाम होईल?
अमेरिका आयफोनचा सर्वात मोठा निर्यातदार आहे. 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत अमेरिकेने भारतातून 44% आयफोन निर्यात केले, परंतु शुल्क लादल्याने स्मार्टफोन आणि त्याच्या सुटे भागांच्या किमतींवर परिणाम होईल. कापड आणि दागिने-रत्न उद्योग लाखो भारतीयांना रोजगार देतो, परंतु शुल्कामुळे या क्षेत्रातील रोजगारावर परिणाम होऊ शकतो. ऑटोमोबाईल आणि सुटे भाग क्षेत्रातील कंपन्यांना मागणी कमी होण्याची भीती आहे. औषधनिर्माण आणि सेमीकंडक्टर उत्पादने सध्या शुल्काच्या कक्षेत नाहीत, परंतु त्यांच्यावर शुल्काचे दीर्घकालीन परिणाम शक्य आहेत.
हेही वाचा - ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरचा परिणाम! भारताने अमेरिकेच्या F-35 लढाऊ विमान खरेदीस दिला नकार
राष्ट्रीय हिताशी तडजोड नाही -
दरम्यान, भारत सरकारने या टॅरिफ धोरणाचा बारकाईने अभ्यास सुरू केला आहे. सध्या द्विपक्षीय व्यापार करारावर (BTA) चर्चा सुरू असून, 2030 पर्यंत अमेरिकेसोबत 500 अब्ज डॉलर्सचा व्यापार करण्याचे लक्ष्य आहे. भारताने स्पष्ट केले आहे की, रशियाशीचा ऊर्जा व संरक्षण करार राष्ट्रीय हितासाठी महत्त्वाचा आहे. बर्बन व्हिस्की व मोटारसायकलींवरील कर कमी करण्यात आले आहेत. मात्र कृषी व दुग्धजन्य पदार्थांवरील कर कायम राहतील. तथापी, डोनाल्ड ट्रम्प यांची ही टॅरिफ धमकी केवळ व्यापारापुरती मर्यादित नाही, तर भारताच्या परराष्ट्र आणि राष्ट्रीय धोरणांवरही परिणाम करू शकते.