India UK Free Trade Agreement
Edited Image
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आगामी लंडन दौरा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे. यावेळी भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यात मुक्त व्यापार करार अंतिम रूपात निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या चर्चांना आता मूर्त स्वरुप मिळणार असून या करारामुळे सामान्य ग्राहकांना थेट दिलासा मिळेल, असे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
FTA म्हणजे काय?
FTA अंतर्गत, दोन्ही देश एकमेकांवरील कस्टम ड्युटी किंवा आयात शुल्क कमी किंवा पूर्णतः रद्द करतात. यामुळे व्यापार वाढतो आणि वस्तूंच्या किंमती घसरतात. भारत-ब्रिटन एफटीए अंतर्गत, भारताला त्याच्या निर्यात वस्तूंपैकी 99 टक्के वस्तूंवर यूकेला करमुक्त निर्यात करण्याचा अधिकार मिळेल. त्याच वेळी, भारत यूकेमधून येणाऱ्या 90 टक्के उत्पादनांवरील शुल्क कमी करेल.
काय स्वस्त होणार ?
या करारामुळे यूकेहून येणारे इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, कपडे, दागिने आणि शूज यासारख्या वस्तूंच्या किंमतीत घसरण अपेक्षित आहे. तर भारताकडून यूकेला कापड, सागरी उत्पादने, वस्त्र आणि दागिने मोठ्या प्रमाणावर निर्यात होतील, ज्यामुळे नवीन बाजारपेठ उपलब्ध होईल. विशेषतः यूकेमधून येणारे स्मार्टफोन, हेडफोन, ब्रँडेड कपडे आणि इतर गॅझेट्स आता तुलनेने कमी किमतीत उपलब्ध होतील. त्यामुळे ग्राहकांना अधिक पर्याय आणि चांगली स्पर्धा अनुभवायला मिळेल.
काय महाग होणार?
तथापि, भात, गहू यांसारख्या महत्त्वाच्या कृषी उत्पादनांवर संरक्षण ठेवले गेले असून त्यामध्ये फारसा बदल होणार नाही. तसेच युकेमधून आयात होणाऱ्या कार्स, स्टील आणि मेटल उत्पादने ही स्पर्धा आणि टॅरिफ स्ट्रक्चरमुळे महाग होण्याची शक्यता वर्तवली जाते.
हेही वाचा - भारतात 90 टक्के टीव्ही डिस्प्ले चीनमधून आयात; 100 अब्ज डॉलर्सची व्यापार तूट; मेक इन इंडिया अपयशी?
सामान्य माणसाला काय फायदा?
सामान्य ग्राहकांना दैनंदिन वापरातील वस्तू स्वस्त दरात मिळण्याचा फायदा होणार आहे. तसेच उद्योग-व्यवसायांना चालना मिळून रोजगाराच्या संधी वाढण्याची शक्यता आहे. भारतात खासगी क्षेत्र आणि उत्पादन उद्योग यांना नवसंजीवनी मिळू शकते.
हेही वाचा - इटरनलच्या शेअरमध्ये 15 टक्के वाढ; दीपिंदर गोयल यांच्या संपत्तीत पडली 'इतक्या' कोटींची भर
दरम्यान, मोदींचा लंडन दौरा केवळ राजनैतिक दृष्टिकोनातून नव्हे तर सामान्य नागरिकांसाठीही निर्णायक ठरणार आहे. काही वस्तूंमध्ये दिलासा मिळणार असला तरी काही उत्पादनांमध्ये किंमतीत वाढ दिसू शकते. त्यामुळे या कराराचा फायदा-तोटा समजून घेणे आवश्यक आहे. तथापी, भारत-यूके मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही देशांमध्ये आर्थिकदृष्ट्या मैत्री वाढणार आहे.