Monday, September 01, 2025 07:17:59 PM

R Ashwin In T20 League: आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर अश्विन आता 'या' परदेशी लीगमध्ये खेळणार

चेन्नई सुपर किंग्जकडून शेवटचा आयपीएल सामना खेळणाऱ्या अश्विनने आता आंतरराष्ट्रीय लीग टी-20 मध्ये रस दाखवला आहे.

r ashwin in t20 league आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर अश्विन आता या परदेशी लीगमध्ये खेळणार

R Ashwin In T20 League: भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनने या आठवड्याच्या सुरुवातीला आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली. यापूर्वीच अश्विनने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला होता. चेन्नई सुपर किंग्जकडून शेवटचा आयपीएल सामना खेळणाऱ्या अश्विनने आता आंतरराष्ट्रीय लीग टी-20 मध्ये रस दाखवला आहे. अहवालानुसार, अश्विन आयएलटी20 लिलावासाठी नोंदणी करेल अशी शक्यता आहे. जर सर्व काही व्यवस्थित राहिले, तर तो पुढील वर्षी 2 डिसेंबर ते 4 जानेवारी दरम्यान होणाऱ्या यूएई लीगमध्ये खेळताना दिसेल.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, आयएलटी20 आयोजक अश्विनशी चर्चा करत आहेत आणि नामांकनाची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर त्याचे नाव लिलाव यादीत येऊ शकते. लिलावासाठी नोंदणीची शेवटची तारीख 10 सप्टेंबर असून हा लिलाव 30 सप्टेंबर रोजी दुबईत होणार आहे. अश्विनने म्हटले आहे की, 'हो, मी आयोजकांशी चर्चा करत आहे. आशा आहे की मी लिलावासाठी नोंदणी केली तर मला खरेदीदार मिळेल.'

ILT20 लीगमध्ये खेळाडूंच्या भरतीसाठी पूर्वी ड्राफ्ट सिस्टीमचा अवलंब केला जात होता, परंतु यावर्षी आयोजकांनी लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. जर अश्विनची निवड झाली, तर तो UAE लीगमध्ये सामील होणारा भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठे नाव बनेल. सध्या रॉबिन उथप्पा आणि युसूफ पठाण यांची निवड झाली आहे, परंतु त्यांनी अद्याप पदार्पण केलेले नाही. अंबाती रायुडू हा या स्पर्धेत खेळणारा एकमेव भारतीय आहे, ज्याने MI अमिरातीतून आठ सामने खेळले आहेत.

हेही वाचा - Rahul Dravid: राजस्थान रॉयल्समध्ये संघर्ष! राहुल द्रविडने 'या' कारणांमुळे सोडले संघाचे प्रशिक्षकपद

अश्विनने आयपीएलमध्ये 221 सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्ज, रायझिंग पुणे सुपरजायंट्स, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या पाच वेगवेगळ्या फ्रँचायझींसाठी खेळले आहे. तसेच तो तामिळनाडू राज्य संघ आणि टीएनपीएलमध्येही खेळला आहे. 38 वर्षीय अष्टपैलू खेळाडू अश्निनने सर्व फॉरमॅटमध्ये भारतासाठी 282 सामने खेळले आहेत आणि तो भारताचा सर्वात जास्त सामने जिंकणारा खेळाडू आहे.

हेही वाचा - Axar Patel: अक्षर पटेलचे कर्णधारपद धोक्यात, दिल्ली कॅपिटल्सच्या नेतृत्वात होऊ शकतो मोठा फेरबदल

अश्विनने एका वृत्तात सांगितले की, तो आंतरराष्ट्रीय लीगमध्ये खेळाडू-सह-प्रशिक्षक म्हणूनही सहभागी होऊ इच्छितो. पुढील वर्षी तो अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेट (MLC) आणि इंग्लंडमधील द हंड्रेडमध्ये भाग घेण्याची शक्यता आहे. अश्विनच्या या निर्णयामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींना आता त्याला जागतिक स्तरावर वेगळ्या लीगमध्ये खेळताना पाहण्याची संधी मिळणार आहे.


सम्बन्धित सामग्री