मुंबई : एअर इंडिया - विस्तारा या दोन विमान कंपन्यांच्या विलीनीकरणाची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विलीनीकरण पूर्ण झाल्यामुळे टाटा समुहाच्या ताफ्यातील प्रवासी विमानांची संख्या २०८ झाली आहे. कंपनीची विमानं आता दर आठवड्याला ५६०० पेक्षा जास्त उड्डाणे करणार आहेत. टाटा समुहाची कंपनी देशातील ९० ठिकाणी विमान सेवा पुरवणार आहे. नव्या व्यवस्थेनुसार एअर इंडियाची विमानं एआय (AI) हा कोड वापरतील तर विस्ताराची विमानं चार आकडी उड्डाण क्रमांक वापरतील. या उड्डाण क्रमांकांची सुरुवात २ या आकड्याने होणार आहे. यामुळे यूके ९५५ हा उड्डाण क्रमांक असलेले विस्ताराचे विमान आता एआय २९५५ (AI 2955) या नव्या उड्डाण क्रमांकाने प्रवास करेल.
विस्तारा लॉयल्टी प्रॉग्रॅमचे नाव क्लब विस्तारा असे आहे. या क्लब विस्ताराचे सदस्य आता एअर इंडिया फ्लाईंग रिटर्न प्रोग्रॅमचे अर्थात महाराजा क्लबचे सदस्य होतील. विस्तारा कंपनीत सिंगापूर एअरलाईन्सचे ४९ टक्के मालकी हक्क होते. एअर इंडिया - विस्तारा विलीनीकरणातून तयार झालेल्या नव्या एअर इंडिया कंपनीत सिंगापूर एअरलाईन्सचे २५.१ टक्के मालकी हक्क असतील. नवी विमान कंपनी प्रवाशांना उत्तम सेवा देईल, असा विश्वास टाटा समुहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी व्यक्त केला.