Army Helicopter Crash In Pakistan: पाकिस्तानच्या गिलगिट-बाल्टिस्तान प्रांतातील चिलास शहरात सोमवार, 1 सप्टेंबर रोजी एक भयानक लष्करी हेलिकॉप्टर अपघात घडला. पाकिस्तानी लष्कराचे एमआय-17 हेलिकॉप्टर अचानक कोसळले. त्यानंतर मोठा स्फोट झाला, ज्यामुळे आकाशात धुराचे लोट पसरले. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पायलट आणि तीन क्रू मेंबर्सचा समावेश आहे.
गिलगिट-बाल्टिस्तान सरकारचे प्रवक्ते फैजउल्लाह फाराक यांनी या अपघाताबाबत माहिती देताना सांगितले की, हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला. हेलिकॉप्टर उतरवण्याचा प्रयत्न करत असताना यंत्रणेतील तांत्रिक अडचणींमुळे ते अचानक कोसळले. घटनास्थळी पोहोचलेल्या स्थानिक आणि लष्करी अधिकार्यांनी मृतदेह व अवशेष गोळा केले आणि सुरक्षिततेसाठी परिसर सुरक्षित केला.
हेही वाचा - Ind VS China: चीनची भारताविरोधी डाव; 'या' आवश्यक गोष्टीवर पुन्हा बंदी घालणार; शेतकऱ्यांवर होणार परिणाम
या घटनेची चौकशी सुरु करण्यात आली आहे. पोलिस पथकासह एक विशेष तपास पथक घटनास्थळी दाखल झाले असून, अपघाताचे नेमके कारण शोधून तपासणी करण्यात येणार आहे. प्रथमदर्शनी माहिती आणि साक्ष्यांच्या आधारे अपघाताचे स्वरूप स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पाकिस्तानी लष्कर आणि स्थानिक प्रशासनाने या अपघातानंतर सुरक्षा उपाय मजबूत करण्याचा निर्णय घेतला असून, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आवश्यक पावले उचलण्याचा इशारा दिला आहे. या अपघाताची संपूर्ण चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यासंबंधी अधिकृत अहवाल प्रसिद्ध केला जाईल, ज्यात अपघाताचे नेमके कारण, जबाबदारी आणि पुढील सुधारणा यांचा तपशील दिला जाईल.
हेही वाचा - SCO Conference In China: 'दहशतवादावर दुहेरी निकष स्वीकारार्ह नाहीत...'; चीनमधील एससीओ परिषदेत पंतप्रधान मोदींचे महत्त्वाचे वक्तव्य
अलिकडे विमान आणि हेलिकॉप्टर अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या अपघातांमध्ये अनेकदा जीवितहानी होत असल्याने जागतिक पातळीवर ही गंभीर चिंता व्यक्त होत आहे. तांत्रिक अपयश, हवामानाचा प्रभाव, देखभाल आणि सुरक्षा उपायांच्या त्रुटी या घटना घडण्यामागील मुख्य कारणे असल्याचं समोर येत आहे.