कानपूर : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा सामना शुक्रवार २७ सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क येथे होणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सामन्याच्या पहिल्या दोन दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता आहे पण पुढील तीन दिवसांत पावसाची शक्यता नाही. हा अंदाज कळल्यापासून क्रिकेटप्रेमी चिंतेत आहेत.
भारताने बांगलादेशविरुद्धची चेन्नई कसोटी २८० धावांनी जिंकली. आर. अश्विन सामनावीर झाला. या विजयामुळे भारताने बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १ - ० अशी आघाडी घेतली आहे. चेन्नई कसोटीतील विजयामुळे भारताने कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात पहिले स्थान पटकावले आहे. भारताने आतापर्यंत १० कसोटी सामन्यांपैकी ७ जिंकले आहेत. भारतीय संघाचा दोन सामन्यात पराभव झाला तर एक सामना अनिर्णित राहिला. यंदाच्या कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सध्या भारताचे विजयाचे प्रमाण टक्केवारीच्या स्वरुपात सर्वाधिक आहे. पण कानपूर कसोटीत पावसाचा व्यत्यय आला तर क्रिकेटची मजा अनुभवता येईल का ? हा प्रश्न क्रिकेटप्रेमींना भेडसावत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार शुक्रवार २७ सप्टेंबर रोजी पावसाची शक्यता ९३ आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवार २८ सप्टेंबर रोजी पावसाच शक्यता ८० टक्के आहे. यानंतर रविवार २९ सप्टेंबर रोजी पावसाची शक्यता ५९ टक्के तर सोमवार ३० सप्टेंबर रोजी पावसाची शक्यता ३ टक्के आहे. सामन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे १ ऑक्टोबर रोजी पावसाची शक्यता एक टक्का एवढीच आहे.
उत्तर प्रदेशमध्ये जुलै ते सप्टेंबर या कालावधीत अनेकदा पाऊस पडतो. यामुळे कानपूर कसोटीवर पावसाचे सावट आहे. याआधी सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात नोएडा येथे अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात एक कसोटी सामना होणार होता. पण सततच्या पावसामुळे हा सामना एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला. कानपूर कसोटीत सुरुवातीला पाऊस पडला तर षटके कमी करुन सामना खेळवण्याबाबत विचार होण्याची शक्यता आहे.