Cancer Detection With Diamonds: ब्रिटिश शास्त्रज्ञांनी स्तनाचा कर्करोग शोधण्यासाठी एक अनोखी आणि पूर्णपणे नवी पद्धत विकसित केली आहे. या तंत्रात हिऱ्यांचा वापर करून कर्करोग ओळखण्यात येतो. या नव्या तंत्रज्ञानामुळे कर्करोगाचा शोध अधिक सोपा, सुरक्षित आणि दुष्परिणाममुक्त होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. कर्करोग शरीरात पसरतो तेव्हा तो सर्वप्रथम जवळच्या लिम्फ नोड्समध्ये पोहोचतो. आतापर्यंत डॉक्टर कर्करोग तपासण्यासाठी रेडिओएक्टिव्ह पदार्थ किंवा चमकदार रंगांचा वापर करत असत. परंतु, या पद्धतींमध्ये अनेक अडचणी येतात. अनेकदा रुग्णांना रंगांमुळे ऍलर्जी होत असे, तर दुसरीकडे रुग्णालयांमध्ये रेडिओएक्टिव्ह पदार्थ ठेवणे आणि वापरणे धोकादायक ठरते.
हिर्यांवर आधारित नवे तंत्र -
ही समस्या दूर करण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक विशेष चुंबकीय सेन्सर तयार केला आहे. या तंत्रात शस्त्रक्रियेपूर्वी किंवा दरम्यान डॉक्टर रुग्णाच्या ट्यूमरमध्ये चुंबकीय द्रव इंजेक्ट करतील. हा द्रव कर्करोग पसरतो त्याच मार्गाने लिम्फ नोड्सपर्यंत जाईल. त्यानंतर, डॉक्टर एका विशेष सेन्सरच्या मदतीने तपासणी करतील, ज्याच्या टोकाला एक सूक्ष्म हिरा बसवलेला असेल.
हेही वाचा - Chanakya Niti : या 5 चुका सगळं गमावायला ठरतात कारणीभूत; आचार्य चाणक्यांनी सर्वांना केलंय सावध
या हिऱ्यामध्ये असलेले नायट्रोजन रिक्तता केंद्र इतके संवेदनशील असते की ते चुंबकीय उर्जेतील अतिशय सूक्ष्म बदल देखील ओळखू शकते. यामुळे कर्करोगाच्या पेशी नेमक्या कुठपर्यंत पसरल्या आहेत हे सहज कळू शकते.
हेही वाचा - Green Chilli Benefits: हिरवी मिरची आहे पचनाचे टॉनिक! रिकाम्या पोटी खाल्ल्याने मिळतात 'हे' अनोखे फायदे
दुष्परिणामविरहित तंत्रज्ञान
दरम्यान, वारविक विद्यापीठाचे प्राध्यापक गॅविन मोर्ले यांनी सांगितले की, हिऱ्याचे हे विशेष केंद्र केवळ चुंबकीय बदल ओळखत नाही, तर त्यातून हलका गुलाबी रंगही निर्माण होतो. त्यामुळे डॉक्टरांना तपासणीदरम्यान अधिक स्पष्ट चित्र मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पद्धतीमुळे रुग्णांना कोणताही दुष्परिणाम होत नाही. तज्ज्ञांच्या मते, हिऱ्यांवर आधारित ही नवी पद्धत भविष्यात कर्करोग तपासणीसाठी एक सुरक्षित, किफायतशीर आणि विश्वासार्ह पर्याय ठरू शकते. यामुळे केवळ निदान सुलभ होणार नाही तर कर्करोगाविरुद्धच्या लढाईत विज्ञानाला एक नवीन दिशा मिळेल.