मुंबई : देशातील मतदारयादी अधिक अचूक करण्यासाठी निवडणूक आयोग लवकरच विशेष सखोल फेरतपासणी (Special Intensive Revision - SIR) मोहीम सुरू करणार आहे. या प्रक्रियेत जवळपास निम्म्याहून अधिक मतदारांना कोणतेही कागदपत्र सादर न करता यादीत आपले नाव कायम ठेवता येणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
2002 ते 2004 दरम्यान अनेक राज्यांमध्ये अशी मोहीम पार पडली होती. त्यावेळी नोंदवलेले मतदारांचे तपशील नव्या ‘एसआयआर’ मोहिमेत ग्राह्य धरले जाणार आहेत. या कालखंडाला अंतिम आधार मानण्यात येणार असल्याने लाखो मतदारांना दिलासा मिळेल. आयोग लवकरच या देशव्यापी मोहिमेची तारीख जाहीर करणार आहे. दरम्यान, राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना त्या काळातील यादी अद्ययावत करून तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्लीमध्येही SIR-2025 मोहिमेची तयारी सुरू झाली आहे. आयोगाने 2002 मधील मतदारयादी अपलोड करून तिचे सध्याच्या मतदारसंघांशी मॅपिंग केले आहे. दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी सांगितले की, “SIR-2025 साठी तयारी वेगाने सुरू आहे. जुनी यादी व नवे मतदारसंघ यांचा डेटा उपलब्ध करून देण्यात आला आहे.”
हेही वाचा : Sangamner News : दिलासा! संगमनेरकरांचा 40 वर्षांचा भूविवाद अखेर मार्गी लागणार
बिहारमध्ये जून महिन्यात झालेल्या ‘एसआयआर’ प्रक्रियेवर विरोधकांनी टीका केली होती. त्यांच्या मते, आवश्यक कागदपत्रांच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे मतदानाचे हक्क धोक्यात येऊ शकतात. सर्वोच्च न्यायालयाने मात्र आयोगाला स्पष्ट निर्देश दिले की, कोणत्याही पात्र मतदाराचे नाव यादीतून वगळले जाऊ नये. आयोगाच्या मते, या मोहिमेचा उद्देश म्हणजे मतदारांचे जन्मस्थान तपासून परकीय बेकायदेशीर स्थलांतरितांची ओळख पटवणे आणि त्यांना यादीबाहेर ठेवणे हा आहे.