मुंबई: देशभरात सध्या उन्हाळ्याने आपला कहर सुरू केला असून 21 शहरांमध्ये तापमानाने चाळीशीचा टप्पा ओलांडला आहे. उष्णतेची ही तीव्र लाट गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश आणि ओडिशा या राज्यांमध्ये सर्वाधिक जाणवली जात आहे. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गुजरातमधील कांडला आणि राजस्थानमधील बारमेर या दोन शहरांमध्ये सर्वाधिक म्हणजे तब्बल 45.06 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. ही आकडेवारी मार्च-एप्रिलच्या सरासरीपेक्षा प्रचंड अधिक असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
महाराष्ट्रातील अनेक शहरांनीही उष्णतेचा उच्चांक गाठला आहे. विशेषतः जळगाव, अकोला, नागपूर, यवतमाळ आणि शेनगाव येथे तापमानाने 42 अंशाचा टप्पा सहज पार केला. अकोल्यात 43.02 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, तर जळगावात 42.05 अंशांची नोंद झाली. यवतमाळ, नागपूर आणि शेनगाव येथेही 42 अंशांपेक्षा अधिक तापमान होते. हवामान विभागाने इशारा दिला आहे की, पुढील काही दिवसात या शहरांमध्ये उष्णतेचा तीव्र परिणाम अधिक जाणवू शकतो.
गुजरातमध्ये उष्णतेची लाट प्रचंड तीव्र झाली असून राजकोट, अहमदाबाद, गांधीनगर, अमरेली, भूज, दिसा, सुंदरनगर यांसारख्या शहरांमध्येही तापमान 40 अंशांच्या वर गेले आहे. सर्वाधिक तापमान कांडला येथे नोंदले गेले असून स्थानिक नागरिकांना उन्हाळ्याचा थेट त्रास भोगावा लागत आहे. उष्णतेमुळे रस्त्यावर वर्दळ कमी झाली असून, दुपारच्या सुमारास बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणी ओसाडपणा जाणवतो आहे.
राजस्थानमध्येही बारमेरप्रमाणे जैसलमेर, बिकानेर, जोधपूर, चुरू येथे उष्णतेचा प्रचंड तडाखा बसत आहे. जैसलमेरमध्येही पारा 45 अंशांवर पोहोचल्याचे नोंदले गेले आहे. ओडिशातील बोयुध येथे 42 अंश तापमान, तर मध्य प्रदेशातील होशंगाबाद, खजूराहो आणि रतलाम येथेही पारा चाळीशी पार गेला आहे. हवामान विभागाने सशक्त उष्णतेच्या लाटेचा इशारा देत नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. उन्हाच्या झळांपासून वाचण्यासाठी भरदुपारी बाहेर जाणे टाळण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.