Tuesday, September 02, 2025 12:11:33 AM

लॉस एंजेलिसमध्ये भीषण अपघात! अनियंत्रित वाहनाने 20 हून अधिक लोकांना चिरडले

पूर्व हॉलीवूड परिसरातील सांता मोनिका बुलेव्हार्डवर एक अनियंत्रित वाहन थेट गर्दीत घुसल्यामुळे 20 हून अधिक लोक जखमी झाले. यातील 8 जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.

लॉस एंजेलिसमध्ये भीषण अपघात अनियंत्रित वाहनाने 20 हून अधिक लोकांना चिरडले
Accident in Los Angeles

लॉस एंजेलिस: शनिवारी पहाटे अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहरात एक भीषण अपघात घडला. पूर्व हॉलीवूड परिसरातील सांता मोनिका बुलेव्हार्डवर एक अनियंत्रित वाहन थेट गर्दीत घुसल्यामुळे 20 हून अधिक लोक जखमी झाले. यातील 8 जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. प्राथमिक माहितीनुसार, वेगात असलेल्या वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर वाहन थेट फूटपाथवर उभ्या असलेल्या गर्दीमध्ये घुसले. न्यू यॉर्क टाईम्सच्या अहवालानुसार, घटना सकाळी 4:15 वाजता ही घटना घडली. हा भाग नाईट क्लब्स, रेस्टॉरंट्स आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध असल्याने, पहाटेपर्यंत येथे बऱ्याच लोकांची उपस्थिती होती.

अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. काही लोकांनी तत्काळ जखमींना मदत करण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी घाबरून धावाधाव सुरू केली. अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. 10 हून अधिक रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या. त्यानंतर पीडितांना जवळच्या सीडर-सिनाय आणि केसर परमनेंट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

हेही वाचा -  बेटिंग अॅपप्रकरणी गुगल, मेटाला ईडीचे समन्स

लॉस एंजेलिस पोलीस विभागाच्या म्हणण्यानुसार, या घटनेचा हेतू स्पष्ट नाही. वाहनचालकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याचे मद्यप्राशन, अमली पदार्थ सेवन किंवा दहशतवादी हेतू याची चौकशी सुरू आहे. एफबीआय आणि स्थानिक तपास यंत्रणा यांच्यात समन्वयाने तपास सुरू आहे. दरम्यान, एलएपीडीचे पोलीस प्रमुख मार्क डोनेव्हन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, 'हा अपघात होता की हेतुपुरस्सर कट होता, हे अजून स्पष्ट झालेले नाही. आम्ही सर्व शक्य दृष्टीकोनातून चौकशी करत आहोत.'

हेही वाचा -  Non-Veg Milk: अमेरिकेचा भारतात ‘नॉन-व्हेज मिल्क’ विकण्याचा प्रयत्न; नेमकं काय आहे हे दूध?

तथापी, घटनेनंतर सोशल मीडियावर #LosAngelesAccident हा हॅशटॅग ट्रेंड होत असून, नागरिकांनी जखमींप्रती सहवेदना आणि मदतीची तयारी दर्शवली आहे. काही नागरिकांनी स्थानिक रक्तपेढींमध्ये जाऊन रक्तदान केले, तर काहींनी जखमींना मदत करण्यासाठी स्थानिक स्वयंसेवी संस्थांशी संपर्क साधला.
 


सम्बन्धित सामग्री