Wednesday, August 20, 2025 04:31:59 PM

Kolhapur Panchganga River : पंचगंगेने इशारा पातळी गाठली; राधानगरी धरणाचे 5 दरवाजे बंद, जिल्ह्यात 41 मार्गांवर पाणी

जिल्ह्यातील 41 मार्ग बंद झाले असून, पर्यायी मार्गांवरून वाहतूक सुरू आहे. जिल्ह्यातील पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांची संख्या वाढून 85 वर पोहोचली. जिल्ह्यात सरासरी 65.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

kolhapur panchganga river  पंचगंगेने इशारा पातळी गाठली राधानगरी धरणाचे 5 दरवाजे बंद जिल्ह्यात 41 मार्गांवर पाणी

कोल्हापूर : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस झाला. धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगा नदीच्या (Panchaganga River) राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी आज सकाळी 8 वाजता 39.07 इतकी झाली. यामुळे पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठल्याचे निश्चित झाले आहे.

मुख्य अपडेटस्
- जिल्ह्यात सरासरी 65.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
- पंचगंगेने इशारा पातळी गाठली.
- राधानगरी धरणाचे 5 स्वयंचलित दरवाजे बंद (Kolhapur Radhanagari Dam)
- कोकणातील वाहतूक फक्त आंबोलीमार्गे सुरू आहे. आंबोली वगळता कोल्हापूरचा कोकणशी संपर्क तुटला आहे.
- लोंघे व मांडुकली येथे पाणी आल्याने गगनबावडा मार्ग कालपासूनच ठप्प आहे. 
- फेजीवडे येथे पुराचे पाणी आल्याने राधानगरीला जाणारा मार्ग बंद झाला आहे.
- बाजारभोगाव येथे पाणी आल्याने कळे ते अणुस्कुरा मार्ग बंद झाला आहे. अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्यामुळे हा मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.
- गगनबावडा, राधानगरी राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद आहे.
- अजूनही पाऊस सुरू आहे.

हेही वाचा - Kolhapur rain : पंचगंगा इशारा पातळीकडे; तळकोकण, गोव्याकडे जाणारे तीन मार्ग बंद, कोणत्या धरणातून किती पाणी सोडले?

सोमवारी पात्राबाहेर पडलेले पंचगंगेच्या पुराचे पाणी आज कोल्हापुरातील गायकवाड पुतळ्यापर्यंत आले होते. त्यामुळे कोकणकडे जाणारा छत्रपती शिवाजी पूल ते गंगावेश मार्ग हा वाहतुकीस बंद झाला आहे. शिवाय, जिल्ह्यातील 41 मार्ग बंद झाले असून, पर्यायी मार्गांवरून वाहतूक सुरू आहे. जिल्ह्यातील पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांची संख्या वाढली असून आता 85 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यात सरासरी 65.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

राधानगरी धरणाच्या सात पैकी आज पहाटे 5 स्वयंचलित दरवाजे बंद झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. याचा अर्थ धरण क्षेत्रात काही अंशी पाऊस कमी झाला आहे. पाणी पातळी आज दिवसभर स्थिर राहण्याची शक्यता आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट, तर धोका पातळी 43 फूट इतकी आहे. मात्र, पावसाचा जोर असाच राहिल्यास किंवा वाढल्यास लवकरच धोका पातळीकडे वाटचाल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनाने सोमवारपासूनच सतर्कतेची भूमिका घेतली आहे. पुराचे पाणी येणाऱ्या भागातील लोकांना सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्‍यकता भासल्यास स्थलांतराचीही तयारी करण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट
जिल्ह्यात आज व उद्या, मंगळवारी कुलाबा, मुंबई येथील भारतीय हवामान शास्त्र विभाग व प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्रातर्फे कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्टचा अंदाज वर्तविला आहे. मुसळधार ते अति मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट दिला जातो. अंदाजानुसार जिल्ह्यात पाऊस पडत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनही त्यानुसार सतर्क आहे.

एवढ्या पावसाची नोंद
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सकाळी दहापर्यंत सरासरी 65.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
या तालुक्यांमध्ये पाऊस मिलिमीटरमध्ये - गगनबावडा 151.3, हातकणंगले- 50.8, शिरोळ - 34.4, पन्हाळा- 70.9, शाहूवाडी- 77, राधानगरी- 91.8, करवीर - 59.9, कागल- 72, गडहिंग्लज- 51.9, भुदरगड- 92.2, आजरा- 66.9, चंदगड- 65.4.

हेही वाचा - Kolhapur Rain, Travel Update : कोल्हापूर जिल्ह्यातले हे मार्ग बंद; अनावश्यक प्रवास न करण्याचा सल्ला


सम्बन्धित सामग्री