यंदा महायुती सरकारची लाडकी बहीण योजना बहुचर्चेत आणि महिलांसाठी फायदेशीर ठरली. प्रतिमहिना महिलांना 1500 रुपये महायुती सरकारने दिले. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडी सरकारने लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देण्याचा शब्द दिला होता तर महायुती सरकारने दरमहा 2100 रूपये देण्यात येईल असे सांगितले होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेला सुरुवात झाली. आणि महिलांना याचा लाभ देखील झाला.
याच विश्वासावर लाडक्या बहिणींनी महायुती सरकारला सत्तेत आणल्यास मदत केली. त्यामुळे आता नवीन सरकार सत्तेवर येईल व डिसेंबर ते मार्च या चार महिन्यांतील प्रलंबित लाभ मिळेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 1 एप्रिलपासून योजनेसाठी पात्र लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये मिळतील. त्यासंदर्भातील घोषणा आगामी काही दिवसांत होईल, अशीही माहिती समोर आली आहे.