नवी दिल्ली : हिंदू धर्मात गंगा नदीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. गंगा नदीशी संबंधित अनेक पौराणिक-धार्मिक कथा सांगितल्या जातात. गंगा नदीत किंवा गंगाजलाने स्नान करणे खूप पवित्र मानले जाते. काशीला वाराणसी असेही म्हणतात, हे गंगा नदीच्या किनारी वसलेले प्राचीन शहर आहे. हिंदू धर्मियांसाठी हे अत्यंत पवित्र स्थळ मानले जाते. येथे मृत्यू आल्यास मोक्षाची प्राप्ती होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. काशीतील गंगा नदीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इतर ठिकाणांप्रमाणे उत्तरवाहिनी न राहता ती येथे दक्षिणवाहिनी होते, म्हणजेच थोडक्यात तिचा प्रवाह उलटा होतो.
पौराणिक कथा : गंगानदीने दिशा का बदलली?
गंगा नदीच्या या उलट्या प्रवाहामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते. असे म्हटले जाते की, गंगा जेव्हा स्वर्गातून पृथ्वीवर आली, तेव्हा ती अत्यंत वेगाने वाहत होती. या जोरदार प्रवाहामुळे काशीजवळ भगवान दत्तात्रेय यांचा कमंडलू आणि कुशासन देखील वाहून गेले. भगवान दत्तात्रेयांना जेव्हा हे कळले, तेव्हा त्यांनी गंगेला त्यांचा कमंडलू आणि कुशासन परत करण्याची विनंती केली.
हेही वाचा - Magh Sankashti Chaturthi 2025: माघी संकष्टी चतुर्थी डबल शुभ योगात, पहा मुहूर्त, मंत्र-चंद्रोदय, गणेश कृपा उपाय
गंगेला आपल्या हातून चूक झाल्याची जाणीव होऊन तिने भगवान दत्तात्रेयांची क्षमा मागितली आणि त्यांचे कमंडलू व कुशासन परत केले. यानंतर गंगा नदीने काशीमध्ये आपली दिशा बदलली आणि उलट्या दिशेने वाहू लागली. त्यामुळे काशीतील गंगा नदीचा हा प्रवाह भगवान दत्तात्रेयांच्या सन्मानासाठी असल्याचे मानले जाते.
नद्यांच्या प्रवाहातील नैसर्गिक बदल -
गंगानदीच्या या उलट्या प्रवाहामागे भौगोलिक कारणेही आहेत. काशीच्या भूगोलानुसार गंगा नदीचे पात्र कमानीच्या आकाराचे आहे. त्यामुळे जेव्हा गंगा नदी काशीमध्ये प्रवेश करते, तेव्हा ती प्रथम पूर्वेकडे वळते आणि नंतर उत्तर-पूर्वेकडे वाहू लागते. या नैसर्गिक वळणामुळे गंगानदीचा प्रवाह उलटा दिसतो.
हेही वाचा - शनीदेव आहेत मेहरबान! मग चिंता कसली.. पुढच्या दीड महिन्यात 'या' राशी होणार मालामाल
धार्मिक महत्त्व - काशीतील या उलट्या प्रवाहामुळे शहराचे धार्मिक महत्त्व आणखीन वाढले आहे. भक्तगण याला दैवी चमत्कार मानतात. अनेकांना गंगानदीचा हा प्रवाह अद्भुत वाटतो आणि ही परमेश्वराची लीला समजली जाते. त्यामुळे काशीला भेट देणाऱ्या भाविकांसाठी हा एक विशेष आकर्षण ठरतो. काशीतील गंगानदीचा हा प्रवाह केवळ एक भौगोलिक वैशिष्ट्य नसून तो श्रद्धा, इतिहास आणि अध्यात्म यांचा अनोखा संगम आहे.
(अस्वीकरण : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही. )