नवी दिल्ली: युनायटेड एअरलाइन्सच्या विमानासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. या विमानाचा मोठा अपघात टळला आहे. युनायटेड एअरलाइन्सचे बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमानाने वॉशिंग्टनहून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानाच्या इंजिनमध्ये समस्या निर्माण झाली. त्यानंतर पायलटने 'मेडे' अलर्ट जारी केला. जेव्हा विमानात बिघाड झाला तेव्हा ते सुमारे 5 हजार फूट उंचीवर होते.
प्राप्त माहितीनुसार, UA108 या फ्लाइटने वॉशिंग्टनहून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच सुमारे 5 हजार फूट उंचीवर डाव्या बाजूच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले. पायलटने तत्काळ 'MAYDAY' संदेश पाठवत नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. तथापी, विमानात असलेले इंधन कमी करण्यासाठी पायलटने सुमारे 2 तास 38 मिनिटे वॉशिंग्टनच्या वायव्य भागात हवेत प्रदक्षिणा केली. सुरक्षिततेच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे होते. यानंतर, युनायटेड एअरलाइन्सचे हे विमान अखेर वॉशिंग्टन डलेस विमानतळावर सुरक्षितरित्या उतरले.
हेही वाचा - अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाच्या 112 वैमानिकांनी घेतली होती आजारी रजा
या घटनेच्या काही तास आधीच अमेरिकन एअरलाइन्सच्या डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाण क्रमांक 3023 मध्ये धूर निघाल्याने प्रवाशांना आपत्कालीन स्लाइड्सद्वारे बाहेर काढावे लागले होते. तथापी, युनायटेडच्या ड्रीमलाइनरमध्ये घडलेली ही घटना अलीकडील एअर इंडियाच्या अहमदाबाद अपघाताची आठवण करून देते.
हेही वाचा - मृतदेहाची अदलाबदल! अहमदाबाद अपघातातील प्रशासनाची घोडचूक उघड
अहमदाबाद विमान अपघात
12 जून 2025 रोजी एअर इंडियाचे विमान टेकऑफनंतर काही क्षणांत B.J. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलच्या इमारतीवर कोसळले होते. या अपघातावेळी विमानाचे दोन्ही इंजिनांचे इंधन कटऑफ स्विच अचानक बंद स्थितीत गेले. त्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. तथापी, AAIB व DGCA तपासात अनेक सुरक्षा त्रुटी आढळल्या आहेत. या अपघातात केवळ एका प्रवाशाचा जीव वाचला होता. तर इतर सर्व प्रवाशांना या अपघातात आपला जीव गमवावा लागला होता.