Thursday, August 21, 2025 02:05:36 AM

सभापती राम शिंदेंच्या सत्काराला भाजपा नेत्यांचीच दांडी

विखे-पाटील आणि राम शिंदे यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर

सभापती राम शिंदेंच्या सत्काराला भाजपा नेत्यांचीच दांडी

अहिल्यानगर : विधानपरिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा अहिल्यानगर शहरात सर्वपक्षीय सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र या सोहळ्याला भाजपा नेत्यांनीच दांडी मारल्यामुळे जिल्ह्यात राजकीय चर्चा रंगली आहे. मंत्री राधाकृष्ण विखे, आमदार शिवाजी कर्डीले, आमदार मोनिका राजळे यांच्यासह भाजपाच्या अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी सत्कार सोहळ्याला उपस्थिती लावली नाही. सोहळ्याला दांडी मारण्याची विविध कारणे दिली असली तरी राम शिंदे यांचे झालेले पुनर्वसन भाजपाच्याच एका गटाला मान्य नाही, जिल्ह्यासह राज्यात अशी चर्चा आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

अहिल्यानगर मध्ये वर्चस्वाची लढाई
अहिल्यानगरमध्ये निवडणुकीत भाजपाला चांगले यश मिळाले असून जिल्ह्यात मताधिक्य मिळूनही केवळ विखे-पाटील यांनाच मंत्रिपद दिलेले आहे. जिल्ह्याला एकच मंत्रिपद मिळाल्याने विखेंचे वर्चस्व वाढण्याची जोरदार शक्यता वर्तवली जात आहे. जिल्ह्यात नैसर्गिकतः उत्तर-दक्षिणेत राजकीय तफावत आहे. राधाकृष्ण विखे उत्तरेतील आहेत तर राम शिंदे दक्षिण भागातील आहेत. निवडणुकीत पराभव होवूनही विधानपरिषदेवर राम शिंदे यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री फडणवीसांचे अत्यंत विश्वासू, निष्ठावंत आणि ओबीसी चेहरा म्हणून शिंदेना पुन्हा संधी देण्यात फडणवीसांना यश आले आहे. पराभूत उमेदवाराचे पुनर्वसन आणि जिंकून आलेल्यांना संधी न दिल्याने अंतर्गत धूसफूस सुरू असल्याची जिल्ह्यात चर्चा रंगली आहे. शिंदे यांनी त्यांची राजकीय सलगी असलेल्या राष्ट्रवादीच्या लंकेंना मदत केल्याबाबतही नाराजी होती. विधानसभा निवडणुकीत राम शिंदे आणि राधाकृष्ण विखे- पाटील यांच्यातील वाद वाढला होता. यामुळे या सर्वपक्षीय सत्कार समारंभात भाजपाचे अंतर्गत वाद पुन्हा समोर आले आहे. 

विखे - शिंदे वाद काय?
राम शिंदे - सुजय विखे यांच्यातील संघर्ष जिल्ह्यात सर्वश्रुत आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांचा भाजपा प्रवेशावर शिंदे नाराज होते. जिल्ह्यात भाजपच्या पराभवाला विखे-पाटील जबाबदार असल्याचा शिंदे यांचा आरोप होता. सुजय विखेंच्या उमेदवारीवरूनही शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. सार्वजनिक कार्यक्रमात शिंदे - विखे यांच्या आरोप-प्रत्योरोपांचा कलगीतुरा हा वाढतच चालला आहे. दोघांमधील वाद मिटवण्यासाठी फडणवीसांनी मध्यस्थी केली होती. परंतु तात्पुरती दिलजमाई झाल्याचे प्रदर्शन सर्वत्र झाले मात्र दरी आजही कायम असल्याचे दिसून येत आहे. राम शिंदे यांच्या सर्वपक्षीय सत्काराला भाजपाच्या नेत्यांच्या अनुपस्थितीने पुढील राजकीय समीकरणाला आता वेगळे वळण लागतंय का? अशी चर्चाही रंगू लागली आहे.

हेही वाचा : बीड हत्या प्रकरणात आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पोलिसांच्या ताब्यात


सम्बन्धित सामग्री