पुणे : पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) ने शहरातील २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना ३१ मार्च २०२४ पर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) बसवून घेण्याचे आवाहन केले आहे. याबाबत मंगळवारी आरटीओने आदेश जारी केले आहेत.
देशभरातील वाहन उत्पादक कंपन्यांना १ एप्रिल २०१९ पासून नवीन वाहनांना HSRP देणे बंधनकारक करण्यात आले होते. यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने २०१८ मध्ये आदेश दिले होते. २०१९ पूर्वीच्या वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची आवश्यकता ठरविण्याचा अधिकार राज्य सरकारांना देण्यात आले होते. यामुळे दिल्ली आणि इतर काही राज्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी केली होती.
मात्र, महाराष्ट्र राज्यात अजूनही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लागू करण्यात आले नव्हते, परंतु आता राज्य परिवहन विभागाने या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे. पिंपरी चिंचवड आरटीओने विशेष एजन्सीची नियुक्ती केली असून, ती एजन्सी पिंपरी-चिंचवड आरटीओच्या हद्दीत, तसेच पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर, मावळ आणि लोणावळा तालुक्यांतून वाहनांना नंबर प्लेट बसविणार आहे.
सर्व वाहनधारकांना ३१ मार्च २०२४ पर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. HSRP बसवणे ही सुरक्षा दृष्टीकोनातून महत्त्वाची आहे आणि त्यामुळे वाहनांची ओळख पटविणे सोपे होईल, असे परिवहन विभागाचे मानणे आहे.