National Film Awards: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ही भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोच्च सन्मानांपैकी एक मानली जाते. 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमांच्या आधारे 71व्या राष्ट्रीय पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली. यंदाचा पुरस्कार सोहळा अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरला. बॉलीवूडचे सुपरस्टार शाहरुख खान यांना त्यांच्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीत प्रथमच 'सर्वोत्कृष्ट अभिनेता'चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तर रानी मुखर्जी यांनाही आपल्या अभिनयासाठी विशेष गौरव प्राप्त झाला.
शाहरुख आणि विक्रांत मॅसी ठरले बेस्ट अॅक्टर
‘जवान’ या ब्लॉकबस्टर सिनेमासाठी शाहरुख खान यांना सर्वोत्तम अभिनेत्याचा सन्मान मिळाला आहे. त्यांच्या जोडीला '12th फेल' या आशयघन सिनेमातील भूमिकेसाठी विक्रांत मॅसीलाही समान सन्मानाने गौरवण्यात आले आहे. दोघांचाही अभिनय प्रेक्षकांच्या मनात घर करणारा ठरला आहे.
रानी मुखर्जी यांचा दमदार पुनरागमन
रानी मुखर्जी यांनी काही काळानंतर ‘मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे’ या भावनिक सिनेमातून पुनरागमन केले आणि सरळ 'बेस्ट अॅक्ट्रेस'चा पुरस्कार पटकावला. एका आईच्या संघर्षाची कथा त्यांच्या सशक्त अभिनयाने जिवंत केली.
‘12th फेल’ ठरली सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म
वास्तविक जीवनावर आधारित ‘12th फेल’ या सिनेमाने फक्त अभिनयासाठीच नव्हे तर ‘सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म’ म्हणूनही पुरस्कार पटकावला. विद्यार्थ्यांमधील प्रेरणादायी कथा आणि सादरीकरण या चित्रपटाचे वैशिष्ट्य ठरले.
सुदीप्तो सेन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा सन्मान
‘द केरला स्टोरी’ या वादग्रस्त पण प्रभावी सिनेमासाठी दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांना ‘बेस्ट डायरेक्टर’चा पुरस्कार मिळाला. याच चित्रपटाला सिनेमॅटोग्राफीसाठीही गौरवण्यात आले.
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' संपूर्ण मनोरंजनासाठी सर्वोत्तम चित्रपट
करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमाने ‘होलसम एंटरटेनमेंट’चा पुरस्कार जिंकला. तसेच या चित्रपटातील ‘ढिंढोरा’ गाण्यासाठी ‘बेस्ट कोरियोग्राफी’चाही सन्मान मिळाला.
सहकलाकारांनाही विशेष गौरव
सहायक भूमिकेत काम करणाऱ्या विजयराघवन, मुथुपेट्टई सोमू भास्कर, उर्वशी आणि जानकी बोदीवाला यांनाही त्यांच्या भूमिकांसाठी पुरस्कार मिळाले. तसेच ‘जवान’मधील गाण्यासाठी शिल्पा राव आणि ‘बेबी’ चित्रपटासाठी पीवीएम एस रोहित यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून गौरवण्यात आले.
तांत्रिक बाजूने काही ठळक नावं
‘सॅम बहादुर’ने मेकअप व सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटासाठी पुरस्कार मिळवला. ‘एनिमल’ चित्रपटाने बॅकग्राउंड स्कोअर आणि साउंड डिझाइनसाठी पुरस्कार पटकावले.
भाषिक विभागातील सर्वोत्तम चित्रपट
मराठीमधून ‘श्यामची आई’, तमिळमधून ‘पार्किंग’, तेलुगूमधून ‘भगवंत केसरी’, मल्याळममधून ‘उल्लोझुक्कू’, हिंदीमधून ‘कटहल’, गुजरातीमधून ‘वश’ आणि बंगाली भाषेतून ‘डीप फ्रिज’ यांना त्यांच्या भाषेतील सर्वोत्तम चित्रपट म्हणून राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला.
या पुरस्कारांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की कंटेंट आणि प्रामाणिक अभिनयाला नेहमीच मान मिळतो. 2023 हे वर्ष बॉक्स ऑफिसच्या दृष्टीने जरी यशस्वी ठरलं असलं, तरी अनेक विचारप्रवृत्त चित्रपटांनी यंदा राष्ट्रीय पुरस्कारात बाजी मारली आहे. आता प्रेक्षकांच्या अपेक्षा 2024 मधील सिनेमांकडून अधिक वाढल्या आहेत.