मुंबई : सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते सुभाष घई यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची तब्येत अचानक खालावल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबईतील लीलावती रुग्णालयात आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहे. 79 वर्षीय सुभाष घई यांना काल अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तसंच अशक्तपणा आणि चक्कर येत असल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या ते वैद्यकीय निगराणीखाली आहेत.
कोण आहेत सुभाष घई?
सुभाष घई हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व पटकथालेखक आहे. त्यांनी इ.स. 1982 साली मुक्ता आर्ट्स नावाची चित्रपटनिर्मिती कंपनी स्थापन केली. त्यांनी निर्मिलेल्या चित्रपटांतील कर्ज (इ.स. 1980 ), हीरो (इ.स. 1983 ), मेरी जंग (इ.स. 1985 ), राम लखन (इ.स. 1989 ), सौदागर (इ.स.1991 ), खलनायक (इ.स. 1993 ), परदेस (इ.स. 1997 ) व ताल (इ.स. `1999) हे चित्रपट लोकप्रिय ठरले. सौदागर ह्या चित्रपटासाठी त्यांना 1992 सालचा सर्वोत्तम दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
दरम्यान सुभाष घई यांची अचानक तब्येत खालावल्याने त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा असून त्यांना आयसीयूमधून नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात येणार असल्याची माहितीही समोर आली आहे.