मुंबई : मुंबईतील बहुचर्चित शिवडी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटातून विद्यमान आमदार अजय चौधरी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे सुधीर साळवी मातोश्रीतून प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया न देता निघून गेले. यावरून ते नाराज असल्याचे समजते. त्यानंतर संध्याकाळपर्यंत लालबाग शिवसेना शाखेबाहेर समर्थकांनी मोठी गर्दी केली. सुधीर साळवींनी निर्णय घ्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. मात्र सुधीर साळवीनी समर्थकांना समजावण्याचा प्रयत्न केला.
सुधीर साळवी यांनी शुक्रवारी एक पोस्ट समाज माध्यमावर केली आहे. या पोस्टमध्ये मला तुमच्याशी बोलायचं आहे असं कार्यकर्त्यांना त्यांनी म्हटले आहे. शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता लालबाग शिवसेना शाखेजवळ येण्याची विनंती त्यांनी कार्यकर्त्यांना केली. आता सुधीर साळवी यांची नेमकी भूमिका काय असेल ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.