बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे गेला आहे. सीआयडीचे अप्पर महासंचालक प्रशांत बोरुडे बीडमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीला वेग आला आहे.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीआयडी अप्पर महासंचालक प्रशांत बोरुडे आणि बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत केजमध्ये घटनास्थळी जाऊन चौकशी करणार आहेत. या प्रकरणातील तपासाला वेग आल्याने फरार आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. 28 तारखेला होणाऱ्या सर्वपक्षीय मोर्चाच्या आधी आरोपीला पकडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
'संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्यांना फाशी द्या'
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याची मानले जात आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात त्यांचे पडसाद उमटले. या प्रकरणामुळे विरोधकांकडून सातत्याने मुंडेवर टीका केली जात आहे. आता मुंडेंनी यावर मौन सोडले आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना फाशी द्या अशी मागणी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. राजकारणापोटी आरोप करणे अयोग्य असल्याचेही मुंडे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : कल्याणमध्ये 13 वर्षीय मुलीवर अत्याचार करुन निर्घृण हत्या
'वाल्मिक कराड यांची धस यांच्याशीही जवळीक'
देशमुख हत्येप्रकरणी सातत्याने मंत्री धनंजय मुंडेंवर आमदार सुरेश धस यांच्याकडून टीका करण्यात येत आहे. या प्रकरणी धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं जात आहे. मात्र या प्रकरणी आता मुंडेंनी मौन सोडले आहे. वाल्मिक कराड यांच्याशी आमदार सुरेश धस यांचीदेखील जवळीक असल्याचे मोठे वक्तव्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.
'माझा मीडिया ट्रायल करू नये'
आरोप करणाऱ्या मागे कोण आहे? याचा शोध माध्यमांनी घ्यावा. माझा मीडिया ट्रायल करू नये, असे मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. मला समाजकारण आणि राजकारणातून बाजूला करण्यासाठी हे आरोप केले जात असल्याचे मंत्री मुंडे म्हणाले आहेत.