Mental Health: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये ताणतणावाची समस्या सर्वांनाच भेडसावते. मात्र, पुरुषांपेक्षा महिलांमध्ये ताणतणावाचे प्रमाण दुप्पट असल्याचे समोर आले आहे. मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, महिलांना एकाच वेळी अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात. शरीराच्या प्रतिमेबाबतची असुरक्षितता, अनेक आरोग्य समस्या, कुटुंबासोबत असूनही जाणवणारा एकटेपणा, काम-घर संतुलन राखण्याचा दबाव या कारणांमुळे महिलांवर ताण अधिक वाढतो.
नोकरी करणाऱ्या महिलांमध्ये ताण अधिक
विशेषतः 31 ते 40 वयोगटातील नोकरी करणाऱ्या महिला तणावग्रस्त असल्याचे दिसून आले आहे. त्यांना सतत सर्वत्र स्वतःला सिद्ध करण्याची गरज वाटते. जर त्यांनी यश मिळवले नाही, तर समाज त्यांना कनिष्ठ मानेल अशी भीती त्यांच्या मनात घर करून राहते.
आई झाल्यानंतरची जबाबदारी आणि ताण
दरम्यान, स्त्रीरोगतज्ज्ञांच्या मते, आई झाल्यानंतर महिलांच्या जबाबदाऱ्या वाढतात. मुलाचे अन्न, संगोपन, सुरक्षितता या सर्व गोष्टींची काळजी घेताना महिला सतत दडपणाखाली राहतात. या परिस्थितीमुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.
हेही वाचा - Paracetamol Side Effects: तुम्हीही दररोज पॅरासिटामोल घेताय का? संशोधनात समोर आले गंभीर दुष्परिणाम
महिलांनी तणाव कमी करण्यासाठी काय करावे?
जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी सुधाराव्यात.
नियमित योगा, व्यायाम, चालणे किंवा धावणे यासारख्या शारीरिक हालचाली कराव्यात.
खोल श्वास घेण्याचे व्यायाम, ध्यान आणि हास्य योगाचा सराव करावा.
कुटुंब-मित्रांसोबत वेळ घालवा, पुस्तके वाचा किंवा संगीत ऐका.
तणाव निर्माण करणाऱ्या गोष्टींपासून आणि लोकांपासून अंतर ठेवा.
भरपूर झोप घ्या आणि संतुलित आहार घ्या.
हेही वाचा - Brain Health: रोजच्या डाएटमध्ये 'हे' ड्रायफ्रुट्स समाविष्ट करा आणि आपल्या मेंदूला बनवा सुपरफास्ट
तज्ज्ञाच्या मते, महिलांनी स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याला प्राधान्य द्यावे. समाज काय म्हणेल याचा अति विचार टाळावा. कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र वेळ घालवावा, प्रेम आणि स्वीकाराचे वातावरण तयार करावे. एकूणच, महिलांनी स्वतःसाठी वेळ काढून मानसिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण निरोगी महिला म्हणजे निरोगी कुटुंब आणि निरोगी समाज.
(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)