Health Benefits of Raw Onion : ताज्या भाज्या शरीरासाठी चांगल्या असतात, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. तसेच, कच्च्या भाज्या खाणंही पोटाच्या आरोग्यासाठी लाभदायी असतं. काकडी, टोमॅटो, कांदा, पालक, मेथी, सॅलेड, बीट, गाजर, कोबी या भाज्या आपण कच्च्या खाऊ शकतो. या भाज्यांचा वापर करून कोशिंबीर, सॅलड बनवता येते. कोशिंबीर खायला बहुतेकांना आवडते. ही कोशिंबीर आपल्या जेवणाची चव वाढवते. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, जर तुम्ही नियमित कोशिंबीर किंवा सॅलड खात असाल आणि त्यातून रोज कच्चा कांदा पोटात जात असेल तर शरीरावर काय परिणाम होतो? हे कांद्याचे नियमित सेवन करणे योग्य आहे का?
हृदयासाठी उपयोगी
कांद्यामधील सल्फर संयुगांमध्ये हृदयाचे संरक्षण करणारे गुणधर्म आहेत, रक्तदाब नियंत्रित करतात आणि रक्त गोठण्यास प्रतिबंध करण्यास मदत करतात. कांद्यात सल्फर संयुगे आणि क्वेर्सेटिन भरपूर प्रमाणात असतात. याचा शरीराला ऑक्सिडेटिव्ह ताणाचा सामना करण्यास उपयोग होतो.
हेही वाचा - पपईच्या बिया फेकून देताय? जरा थांबा.. मधुमेहापासून कोलेस्टेरॉलपर्यंत सर्वांवर आहेत गुणकारी, 'अशा' पद्धतीने खा
मधुमेहींना फायदा
कांद्यामध्ये आढळणारे सल्फर संयुगे, क्वेर्सेटिन व खनिज क्रोमियम इन्सुलिन संवेदनशीलता सुधारतात आणि इन्सुलिन प्रतिरोध रोखतात किंवा नियंत्रित करतात, असे त्या म्हणाल्या. तसेच, कच्च्या कांद्याचे सेवन आपल्या पेशींचे संरक्षण करते आणि दाहकता (सूज येणे किंवा लालसरपणा येणे) कमी करते. याचा मधुमेहींनाही फायदा होऊ शकतो.
यासोबत कच्चा कांदा खाल्ल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते
लिंबाचा रस व काळ्या मिरीसह कांदे खाणे खूप चांगले आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती खूप चांगली होते. ज्यांना नेहमी सर्दी होण्याचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हे फायदेशीर आहे. कच्चा कांदा रोज लिंबू आणि मिरीसोबत खाल्ला तर सर्दी होणे आश्चर्यकारकरीत्या कमी होईल.
पचनक्रिया चांगली होते
ज्यांची पचनक्रिया चांगली आहे त्यांच्यासाठी कांदे हा एक उत्तम आहार आहे. कारण कांदा आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांसाठीही योग्य आहार आहे. कारण- त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आतड्यांचे एकूण आरोग्य सुधारते आणि निरोगी आतडे ही निरोगी शरीराची गरज आहे.
हेही वाचा - सारखी गोड खाण्याची इच्छा होतेय? असू शकतं 'या' मानसिक आजाराचं लक्षण; नव्या संशोधनातून खुलासा
दररोज कच्चा कांदा खाण्याशी संबंधित आरोग्य धोके (Health risks associated with eating raw onions daily)
- कांद्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत; परंतु ज्यांना अन्न नीट पचत नाही अशा काही लोकांना कांद्याच्या सेवनामुळे काही पचनाच्या समस्या होऊ शकतात.
- कमी आम्ल पातळी (low acid levels), अॅसिड रिफ्लक्स किंवा आयबीएस यांसारख्या आतड्यांसंबंधीची समस्या असलेल्या लोकांमध्ये कांदा खाण्यामुळे पोटफुगी, गॅस किंवा छातीत जळजळ होऊ शकते. अशा परिस्थितीत कच्चा कांदा टाळावा.
- कांद्यामध्ये रक्त पातळ करण्याचे गुणधर्म असतात आणि त्यामुळे ते रक्ताच्या गुठळ्या रोखण्यासाठी फायदेशीर ठरतात. पण, रक्त पातळ करणारी औषधे घेणार्यांनी कोणत्याही औषधांशी प्रक्रिया होऊ नये यासाठी आपल्या आहारतज्ज्ञ व डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.
अस्वीकरण : ही बातमी सामान्य माहिती आणि घरगुती उपचारांवर आधारित आहे. याचा अवलंब करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.