Friday, September 05, 2025 08:10:30 AM

रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही सुद्धा घरी बनवू शकता 'हे' पदार्थ

अवघ्या काही दिवसांतच रामनवमीचा सण येत आहे. यादिवशी अनेकजण आपल्या घरी प्रसाद बनवतात. चला तर सविस्तर जाणून घेऊया, या दिवशी तुम्ही कोणकोणते पदार्थ बनवू शकता.

रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही सुद्धा घरी बनवू शकता हे पदार्थ

मुंबई: अवघ्या काही दिवसांतच रामनवमीचा सण येत आहे. हा सण आनंदाने आणि मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यादिवशी प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला. चैत्र महिन्यात साजरा होणारा सण यावर्षी 6 एप्रिल रोजी साजरा होणार आहे. यादिवशी अनेकजण आपल्या घरी प्रसाद बनवतात. चला तर सविस्तर जाणून घेऊया, या दिवशी तुम्ही कोणकोणते पदार्थ बनवू शकता.

1 - सुजीचा हलवा:

रामनवमीचे औचित्य साधून तुम्ही सुद्धा घरच्या घरी सुजीचा हलवा बनवू शकता.

सामग्री:

रवा - 2 कप  
तूप - १ वाटी  
बारीक चिरलेले काजू - 1 टीस्पून  
बारीक चिरलेले बदाम - 1 टीस्पून  
मनुका - 1 टीस्पून  
वेलची पावडर - एक चिमूटभर  
बारीक चिरलेला नारळ - 1 टीस्पून  
साखर - 1 कप  
दूध - अर्धा कप  
केशर  

कृती:

सुजीचा हलवा बनवण्यासाठी सर्वप्रथम दुधाला गरम करून घ्या. कंडेन्स्ड मिल्कचा वापर केल्यास हलवा खूप छान पद्धतीने तयार होतो. आता कढईमध्ये तूप गरम करून घ्या. त्यानंतर रवा सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. रवा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये वेलदोडा पावडर, दूध आणि केशर घाला. यामध्ये तुम्ही साखर आणि काही प्रमाणात ड्रायफ्रुट्सचे मिश्रण करून घ्या. त्यानंतर त्याला सतत ढवळत राहा. सुजीचा हलवा नीट शिजून घट्ट झाल्यानंतर त्याला बाहेर काढा आणि ड्रायफ्रुटने सजवा.

हेही वाचा: कडुनिंबाच्या पाल्याचे महत्व आणि फायदे

2 -चणे आणि पुरी रेसिपी:

रामनवमीच्या दिवशी तुम्ही घरच्या घरी हरभरा आणि पुरीचा प्रसाद तयार करू शकता.

सामग्री:

काळे हरभरे - १ कप  
रॉक मीठ - चवीनुसार  
जिरे - १ टीस्पून  
गरम मसाला - १ टीस्पून  
आले - १ छोटा तुकडा  
हिरवी मिरची - २  
हळद - १ टीस्पून  
हिंग - एक चिमूटभर  

चण्याची कृती:

हरभरा नीट धुवून त्याला काही तासांसाठी पाण्यात ठेवा. हरभरे फुगल्यानंतर त्याला कुकरमध्ये ठेवून त्यात हळद आणि मीठ घालून २ ते ३ शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या. आता कढईमध्ये तेल किंवा तूप गरम करा आणि त्यात जिरे आणि हिंग घाला. जिरे तडतडल्यावर आले आणि मिरचीची पेस्ट घालून परतून घ्या. आता त्यात हरभरा घालून चांगले शिजवून घ्या. मीठ, थोडी हळद आणि गरम मसाला देखील मिसळा. तुमचा काळा हरभरा तयार आहे.

पुरी बनवण्यासाठी लागणारे पदार्थ:

पीठ - १ कप  
तूप - २-३ चमचे  
मीठ - चवीनुसार  

कृती: 

पिठात मीठ आणि तूप घालून मिक्स करा. आता थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या. काही काळ त्याला बाजूला ठेवा. आता कढईमध्ये तेल गरम करा. त्यानंतर एक एक करत पुरी तळून घ्या. अशा प्रकारे, तुमचा प्रसाद तयार झाला.

(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)


सम्बन्धित सामग्री