बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील किनगाव या ऐतिहासिक गावात सतराव्या शतकापासून अखंडपणे सुरू असलेल्या पारंपारिक राम जन्मोत्सवाने यंदाही ग्रामस्थांनी अपार श्रद्धा आणि उत्साहाने जल्लोषात साजरा केला. गुढीपाडव्यापासून सुरू होणारा आणि रामनवमीपर्यंत चालणारा हा उत्सव गावासाठी केवळ धार्मिक सोहळा नसून, एक सामाजिक एकतेचे प्रतीक बनला आहे.
300 वर्षांपासून ही परंपरा अखंडपणे सुरू:
या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे गावातील सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन या सोहळ्यात सहभागी होतात. गेल्या 300 वर्षांपासून ही परंपरा अखंडपणे सुरू असून, आजही त्याच भक्तिभावाने आणि श्रद्धेने ती जोपासली जाते. यावर्षीही गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर उत्सवाला सुरुवात झाली आणि नऊ दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
पारंपरिक वेशभूषेत महिलांनी सहभाग घेतला:
रामनवमीच्या दिवशी सकाळी पवित्र वेळी बुलढाणा जिल्ह्यातील किनगावातील मंदिरात पुजाऱ्यांच्या हस्ते राम लल्लाची विधीवत पूजा करण्यात आली. पंचामृत अभिषेक, आरती, राम जन्मसोहळा आणि संध्याकाळी भजन-कीर्तनाच्या माध्यमातून संपूर्ण गाव भक्तिरसात न्हालं. महिलांनी रांगोळी, गोंधळ आणि पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला, तर युवावर्गाने शोभायात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंग भरला.
या उत्सवाने केवळ धार्मिकता नाही, तर एकात्मता, परंपरा आणि सामाजिक सलोखा जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले. किनगावचा राम जन्मोत्सव हा खऱ्या अर्थाने संस्कृतीचा, भक्तीचा आणि एकतेचा उत्सव ठरत आहे.