मुंबई: मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसले आहेत. आज मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे. यासह, मराठा समाज लाखोंच्या संख्येने मुंबईतील आझाद मैदानात उपस्थित आहेत. मात्र, मराठा समाजातील काही आंदोलक आझाद मैदान सोडून मुंबईतील प्रमुख रस्त्यांवर उतरले आहे. यावेळी, मनोज जरांगे म्हणाले की, 'जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्यांची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही'.
हेही वाचा: Shaktipeeth Mahamarg Kolhapur : 'सरकारने कोल्हापूरकरांच्या पाठीत खंजीर खुपसला'; शक्तिपीठ महामार्गावरून सतेज पाटील आक्रमक
मुंबईत मोठी वाहतूक कोंडी
एकीकडे, मनोज जरांगे आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसले आहेत, तर दुसरीकडे मराठा समाजातील काही आंदोलक आझाद मैदान सोडून मुंबईतील प्रमुख रस्त्यांवर उतरले आहे आणि ठिय्या आंदोलन करत आहेत. त्यामुळे, मुंबईकरांना वाहतूक कोंडीच्या समास्या उद्भवत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी पोलीस आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत.
ईस्टर्न फ्री वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
मिळालेल्या माहितीनुसार, सलग दुसऱ्या दिवशीही ईस्टर्न फ्री वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. राज्यातील विविध कानाकोपऱ्यातून हजारो मराठा समर्थक मुंबईच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे, वडाळा - सीएसएमटी मार्गावर असलेल्या ईस्टर्न फ्री वेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. तसेच, सकाळपासूनच ही वाहने रांगेत अडकल्याने वाहनचालकांना खूप त्रास होत आहे. आंदोलनात सहभागी झालेले मराठा आंदोलक मुंबई्च्या दिशेने मोठे ट्रक आणि वाहने आणत होते. तसेच, राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करत होते. यामुळे, मुंबईतील काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली.
सीएसएमटी स्थानकाबाहेर आंदोलकांकडून मुंडन आंदोलन
मराठा आंदोलकांनी सीएसएमटी स्थानकाबाहेरील बीएमसीसमोर ठिय्या आंदोलन केले, त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. यादरम्यान, मराठा समजाची समजूत काढण्यासाठी पोलिसांनी धाव घेतली. तेव्हा, मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. तसेच, आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या करत आरक्षणाची मागणी केली.
मराठा समाजाच्या आंदोलनामुळे सीएसएमटी परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. यादरम्यान, काही आंदोलकांनी मुंडन आंदोलन केले, तर काहींनी रस्त्यावर अंघोळ करून निषेध नोंदवला आहे. जेव्हा पोलिसांनी मराठा आंदोलाकांना गर्दी केली, तेव्हा मराठा आंदोलाक म्हणाले की, 'आमची सोय करा. मगंच आम्ही इथून जाणार'.