Love At First Sight : भारतीय प्रेक्षकांवर चित्रपटांचा मोठा प्रभाव आहे. अनेकदा चित्रपटांतील दृश्य, कथानक आणि प्रेमात बुडालेले नायक-नायिका मनावर इतके बिंबले जातात की, खऱ्या आयुष्यातही असे काहीतरी घडण्याची स्वप्ने पडू लागतात. पण इथे चित्रपटात हिरो आणि हिरोईन एकमेकांना पाहताक्षणीच पायाखाली केळ्याची साल नसतानाही घसरून पडतात..! पण असा प्रकार खऱ्या आयुष्यात घडतोय की काय.. असे वाटू लागले तर, तो भासही असू शकतो.. आपल्याच मनाच्या या कल्पनेमागे धावत राहिल्यास कुठेतरी ठेच लागल्यानंतरच माणूस सावध होतो आणि पस्तावण्याची वेळ येते.
प्रेमात पडताना मनात गुदगुल्या होतात, अंगावर शहारे येतात आणि मागून गिटारचा आवाज ऐकू येतो... हे असंच प्रेम होतं.. असा अनेकांचा समज आहे. पण असं नाही. सिनेमाची दुनिया ही खऱ्या आयुष्यापेक्षा वेगळी असते. शिवाय, चित्रपटात नायक-नायिकेच्या शारीरिक सौंदर्यावरच जास्त भर दिलेला असतो. अशा गोष्टी फॉलो करून काही लोक आपलं कोणासोबत तरी प्रेम जमल्याची कल्पना करू लागतात.. पण एकमेकांचे स्वभाव, कौटुंबिक, आर्थिक आणि वैचारिक पार्श्वभूमी, करिअर याचा विचार करायचा राहून जातो.
हेही वाचा - Relationship Tips : लग्नानंतर पहिल्याच वर्षात तुम्हालाही जाणवतायत 'या' गोष्टी? हे करा, नातं होईल मजबूत
'लव्ह अॅट फर्स्ट साईट', 'प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं,' अशा काल्पनिक जगातल्या भ्रामक समजुतींना बळी पडल्यास एका चुकीच्या नात्यामुळे भविष्यात अंधार होऊ शकतो. कारण, 'नुसतं प्रेम करून पोट आणि मन भरत नाही,' हे वास्तव समोर येतं.
सध्या अशीही स्थिती आहे की, नात्यामध्ये प्रेमाइतकात यश आणि पैसा देखील महत्त्वाचा ठरला आहे. कधीकधी लोक यशापेक्षाही पैसा किंवा सौंदर्यावरच लगेच भाळतात. अनेकदा प्रेमात पडलेल्या दोघांचे पालकही अशा नात्यांना पाठिंबा देतात. त्यांना नातं सुरू करण्याची घाई झालेली असते. काही वेळेस अशी नाती एकतर्फी असतात तर काही दुतर्फा. पण जर एकंदरित विचार करता दोघेही एकमेकांसाठी अयोग्य असतील तर, नजिकच्या काळात याचे परिणाम समोर येऊ लागतात.
असा प्रकार भविष्यात तुमच्यासोबत घडू नये, असं वाटत असेल तर, तुम्हाला काही रेड फ्लॅग्जकडे लक्ष द्यावं लागेल.
कंट्रोल करण्याचा प्रयत्न
जर तुम्ही किंवा तुमचा पार्टनर किंवा दोघेही सतत एकमेकांना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असाल, एकमेकांच्या प्रत्येक गोष्टीत अधे-मधे पडत असाल, तुमच्यापैकी एकजण दुसऱ्याला किंवा दोघेही एकमेकांना मित्रमैत्रिणींपासून दूर ठेवत असाल, तर हा एक मोठा रेड फ्लॅग आहे. अशा प्रकारांवर एकमेकांशी संवाद साधणे किंवा चर्चा करून हे प्रकार थांबवणे आवश्यक आहे. अन्यथा, अशी नाती टिकू शकत नाहीत.
भावनिकदृष्ट्या उपस्थित नसणं
जर तुमचा पार्टनर तुमच्या भावना समजून घेत नाही, स्वतःच्या भावना व्यक्त करत नाही, किंवा तुमच्या सुख-दुःखात सहभागी होत नाही, तर हे नातं एकतर्फी ठरू शकतं.
तुम्हाला सपोर्ट न करणे
तुमच्या स्वप्नांना, करिअरला, निर्णयांना जर तुमचा पार्टनर पाठिंबा देत नसेल किंवा तुम्ही चर्चा करून योग्य तो निर्णय घेत नसाल, तर हे देखील एक नकारात्मक संकेत आहे. नातं असं असावं की एकमेकांना मोठं व्हायला मदत करेल.
सन्मानाचा अभाव
नात्यात सन्मान हा पाया आहे. जर तुमचा पार्टनर तुमचा सतत अपमान करत असेल, तुमच्या मतांना कमी लेखत असेल किंवा तुम्हाला काहीच महत्त्व नाही, असं वागत असेल, तुम्हाला गृहीत धरत असेल, तर हे नातं विषारी ठरू शकतं.
हिंसक वागणूक
शारीरिक किंवा भावनिक मारहाण करणं, सतत रागाने बोलणं, धमक्या देणं हे कोणत्याही नात्यात असणं चांगलं नाही. हिंसक वागणूक हा स्पष्ट रेड फ्लॅग आहे आणि अशा नात्यांपासून लांब राहणंच योग्य.
हेही वाचा - मुले रात्री लवकर झोपत नाहीत? शांत झोपवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
खोटं बोलणं
खोटं बोलणं, गोष्टी लपवणं, फसवणूक करणं हे नात्याच्या विश्वासावर गदा आणतं. एकदा विश्वास गमावला गेला की नातं उभं राहत नाही.
महत्त्वाचं काय?
प्रेम करताना आंधळं प्रेम न करता, जोडीदाराच्या आणि स्वतःच्याही हालचाली आणि वागणुकीकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. डोळे झाकून कोणावर विश्वास ठेवणं तसेच, दुसऱ्याचा विश्वासघात करणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. हे रेड फ्लॅग्स जर तुम्हाला नात्यात जाणवले, तर गप्प बसू नका. त्यावर थेट बोलणं किंवा गरज पडल्यास असं नातं संपवणं आवश्यक आहे.
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही.)