Saw Your Own Death In A Dream? स्वप्न सर्वांनाच पडतात. मात्र, अनेक स्वप्न आपल्या लक्षात राहत नाहीत. काही तात्पुरती लक्षात राहतात, तर काही अनेक वर्षे लक्षात राहतात. अनेकजण आपल्याला पडणाऱ्या स्वप्नांविषयी विचार करत असतात आणि त्याविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता त्यांच्यामध्ये असते. आपण आपल्याला पडलेल्या स्वप्नांची कधी घरातल्यांशी तर कधी मित्र-मैत्रिणींशी चर्चा करत असतो आणि काही स्वप्नांवर हसतही असतो. तर, काही स्वप्नांमुळे आपल्याला भीती वाटू शकते.
स्वप्नांचं जग खूप गूढ आणि गुंतागुंतीचं असतं. आपल्याला कधी कधी अशी स्वप्नं पडतात, ज्यांचा स्पष्ट अर्थ लागत नाही. सर्वात सामान्य स्वप्नांपैकी एक म्हणजे, आपण स्वतःला मरताना पाहतो. हे स्वप्न पाहून आपण घाबरतो आणि त्याचा अर्थ काय असेल, याचा विचार करायला लागतो. पण तुम्हाला माहीत आहे का, की स्वप्नात स्वतःला मरताना पाहणं हा एक खूप सामान्य अनुभव आहे.
हेही वाचा - चेहऱ्यावर बदामाचे तेल लावल्याने सुरकुत्या कमी होतात का? जाणून घेऊ, तज्ज्ञ काय म्हणतात..
स्वप्न विश्लेषकांच्या आणि मानसशास्त्रज्ञांच्या मते, याचा अर्थ असा नाही की, तुमच्या खऱ्या आयुष्यात काहीतरी वाईट घडणार आहे. त्यांनी याबद्दलचे काही संभाव्य अर्थ स्पष्ट केले आहेत, जे व्यक्तीच्या वैयक्तिक अनुभव आणि भावनांवर अवलंबून असतात.
स्वप्नात स्वतःला मरताना पाहण्याचे संभाव्य अर्थ
जागेपणीची भीती आणि चिंता : हे स्वप्न तुमच्या मनात असलेल्या भीती आणि चिंता दर्शवू शकतं. तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल खूप काळजीत असाल आणि ही काळजी तुमच्या स्वप्नातून दिसून येत असेल.
खऱ्या आयुष्यात एखादं काम अपूर्ण असल्याबद्दल टेन्शन : हे स्वप्न तुमच्या आयुष्यातील काही अपूर्ण कामाचं चिन्ह असू शकतं. तुमचं काही अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल किंवा तुम्ही याचा वारंवार विचार करून चिंतातूर राहत असाल.
मोठा बदल घडून येण्याचे चिन्ह : हे स्वप्न तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडणार असल्याचं चिन्ह असू शकतं. हा बदल तुमच्या करिअर, नातेसंबंध किंवा जीवनशैलीशी संबंधित असू शकतो.
नवीन सुरुवात : ज्याप्रमाणे साप कात टाकून (जुनी त्वचा टाकून) नवी त्वचा धारण करतो, त्याच पद्धतीने स्वप्नातील मृत्यू हा मागील मरगळ झटकून नवीन सुरूवात करण्याचे चिन्ह असू शकतो. हे स्वप्न जीवनातील नवीन अध्यायाच्या सुरुवातीचं चिन्ह देखील असू शकतं. तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन सुरू करण्यासाठी तयार असाल.
आत्मपरीक्षण : हे स्वप्न तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल आणि स्वतःबद्दल खोलवर विचार करायला लावू शकतं. तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय हवं आहे आणि तुम्ही कुठे चालला आहात, याचा पुनर्विचार करणं आवश्यक असू शकतं.
हेही वाचा - एकदम टेस्टी! तुम्हाला शेवग्याच्या फुलांची भजी माहीत आहे का? नक्की ट्राय करून पाहा..
स्वप्नाचा अर्थ समजून घेण्यासाठी काय करावं?
तुमच्या भावनांकडे लक्ष द्या : हे स्वप्न पाहिल्यावर तुम्हाला कसं वाटतं? तुम्हाला भीती वाटते, दुःख होतं की शांत वाटतं? तुमच्या भावना स्वप्नाचा अर्थ समजून घेण्यात मदत करू शकतात.
स्वप्नातील तपशील लिहून ठेवा : स्वप्नातील सर्व लहान तपशील लिहून त्याच्यासह संबंधित विषयातील तज्ज्ञाला भेटा. यामुळे स्वप्नाचा अर्थ समजून घेण्यात मदत होऊ शकते किंवा किमान तुमच्या मनाची घालमेल शांत होऊ शकते.
तुमच्या आयुष्यातील घटना आठवा : स्वप्नांवर आपल्या जागृत आयुष्यातील घटनांचा प्रभाव असतो. तुमच्या आयुष्यात अलीकडे काय घडलं आहे, याकडे लक्ष द्या.
स्वप्न तज्ज्ञांशी बोला : शक्यतो स्वप्नातील घटनांवर फार विचार करत बसू नये. मात्र, तुम्हाला अगदीच गरज वाटत असेल तर आणि स्वप्नाचा अर्थ समजत नसेल, तर तुम्ही स्वप्न तज्ञांशी बोलू शकता.
हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की, स्वप्नांचे अर्थ वैयक्तिक असतात. एकच अर्थ प्रत्येकाला लागू होत नाहीत. तुम्हाला अशी स्वप्नं वारंवार येत असतील आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल, तर मानसशास्त्रज्ञांशी बोलणं उत्तम ठरेल. स्वप्नं आपल्या अवचेतन मनाचं प्रतिबिंब असतात. त्यांना समजून घेऊन आपण स्वतःबद्दल खूप काही शिकू शकतो. तसेच,जीवनात आवश्यक सुधारणा करू शकतो.
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)