Situationship And Complications In Relation : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात असलेली नाती टिकवणे, जपणे आव्हानात्मक बनले आहे. तरुण मुले-मुली शिक्षण, कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र येत आहेत. त्यांच्यामध्ये मैत्री होणे किंवा काही अधिक जवळचे नाते तयार होणे ही आता सामान्य बाब बनली आहे. पण मैत्रीच्याही पलीकडे असणारी नाती असणे हा प्रकार वाढला आहे. कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या वारंवार संपर्कात आल्याने आणि थोडे-फार विचार जुळत असल्याने अशी नाती तयार होत आहेत. या नात्यांना काय नाव द्यावे हे समजत नाही. तुम्हीही अशा कोणत्या नात्यात आहात का?
अनेकदा अशा प्रकारची नाती गुंतागुंतीची बनतात. आपण कोणाच्या खूप जवळ जातो, एकत्र वेळ घालवतो. नेहमीप्रमाणे भेट झाली नाही तर, चुकल्या चुकल्यासारखे वाटत राहते. मात्र, आपण त्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये नसतो. त्यामुळे असं नातं नेमकं काय आहे, ते स्पष्ट होत नाही. काही लोकांच्या आयुष्यात तर अशी एका वेळी अनेक नाती असू शकतात. ही नाती पूर्णपणे मैत्रीचीही नसतात आणि पूर्णपणे रिलेशनशिपही नसते. काही वेळेस अशा नाती फक्त तरुणांमध्येच नसतात. तर, ती प्रौढांमध्येही तयार झालेली पाहायला मिळू शकतात.
हेही वाचा - Heart Disease Rates: दर 34 सेकंदाला हृदयरोगाने एका व्यक्तीचा मृत्यू; कोणत्या देशांत आहेत सर्वाधिक रुग्ण? जाणून घ्या
जेव्हा सर्व काही छान असते, ठीक चाललेले असते, तेव्हा काहीच अडचण नसते. एकमेकांना भेटण्यात सोबत वेळ घालवण्यात आनंद वाटत असतो. पण कधी कधी अशी नाती त्रास देऊ लागतात. कारण त्यातील गुंतागुंत खूपच वाढलेली असते. ही स्थिती जसजसा जास्त वेळ जाऊ लागेल, तशी वाढत जाते. याला आताच्या काळात 'सिच्युएशनशिप' म्हटले जाते.
तुम्ही सिचुएशनशिपमध्ये आहात का, हे तुम्हाला कसं ओळखता येईल? जर याच्यामुळे त्रास होत असेल किंवा ताण-तणाव निर्माण होत असेल तर, यातून कसं बाहेर पडता येईल? चला, जाणून घेऊ..
दोघांच्या मनात स्पष्टता नसणे : तुम्ही दोघं एकत्र असता. पण हे नातं काय हे तुम्ही समजून घेतलेलं नसतं. कधी कधी ते मैत्रीपेक्षा अधिक असतं पण ही रिलेशनशिप नाही, अशी जाणीव तुम्हाला एकट्याला किंवा दोघांनाही असते. जर महिन्याभरानंतरही हेच सुरू असेल, तर ही 'सिच्युएशनशिप' आहे. रिलेशनशिपच्या दिशेने जाणाऱ्या खऱ्या नात्याचं बळ हे भविष्याच्या नियोजनात असतं. पण जर तुमचा जोडीदार कधीच भविष्याबद्दल बोलत नसेल, तर तो कमिटमेंट टाळत आहे असं समजा.
भावनिक आणि प्रत्यक्ष आधाराचा अभाव : आवश्यक तेव्हा जोडीदार तुमच्या पाठीशी उभा राहत नसेल किंवा तुमच्यामध्ये फक्त वरवर भेटी होत असतील आणि थोड्या-फार गप्पागोष्टी होत असतील तर, हे नातं रिलेशनशिपच्या दिशेने जाणारे नातं नव्हे. काही वेळेस ते एकतर्फीही असू शकतं. या नात्याचा तुम्ही अधिक विचार करत आहात आणि दुसऱ्याच्या मनात त्याविषयी फारसं काही नाही, असाही याचा अर्थ होऊ शकतो.
फक्त सोयीसाठी भेटणं : नातं जर फक्त सोबतच्या सोयीप्रमाणे चालत असेल आणि तुमच्यासाठी वेळ देणं त्याच्या दृष्टीने फारशी महत्त्वाची बाब नसेल, तर ही बाब देखील तुम्ही अशा नात्यातून बाहेर पडावे याचा संकेत ठरू शकतो.
नेहमी गोंधळ आणि असुरक्षितता जाणवणं : सतत मनात प्रश्न असतो की आपलं नातं नेमकं काय आहे? यात उद्या अधिक चांगली स्थिती असेल की नसेल? अशा प्रकारचा गोंधळ नेहमी होत असेल, तुमच्या मनात नात्याविषयी भीती, गोंधळ किंवा असुरक्षितता असेल आणि जर तुमच्या सोबतची व्यक्ती याबाबत गंभीर नसेल किंवा तुम्ही याबाबतचा विषय काढताच तो टाळत असेल, तर हेही सिच्युएशनशिपचं लक्षण आहे.
यातून बाहेर कसं पडायचं?
- खुलेपणाने बोलणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या सोबतच्या व्यक्तीला स्पष्ट विचारलं पाहिजे की, तो किंवा ती या नात्याकडे कशा नजरेतून पाहते. हे नातं पुढे कुठे जाऊ शकतं आदी..
- मर्यादा ठरवा : जर तुमच्या सोबतची व्यक्ती कमिटमेंटपासून पळत असेल, तर तुमच्या नात्याला वेळीच सीमा द्या. नाहीतर, पुढील काळात तुम्हाला अधिकाधिक भावनिक त्रास होत राहू शकतो.
- तुम्हाला काय वाटते याचा नीट विचार करा. स्वतःला महत्त्व द्या. फक्त त्या व्यक्तीच्या विचारांवर चालू नका, स्वतःच्या भावना ओळखा. जर नातं तुम्हाला त्रास देत असेल, तर धाडसाने त्यातून बाहेर पडा.
- नातं संपलं किंवा संपणार असेल तर स्वतःला समजून घ्या. मित्र-परिवारासोबत वेळ घालवा आणि नवीन सुरुवात करा.
ही बाब नेहमी लक्षात ठेवा की रिलेशनशिप ही बाब तुम्ही स्वतःही गांभीर्याने घेण्याची बाब आहे. तुमचे स्वतःचे आणि सोबतच्या व्यक्तीचे एकमेकांबद्दलचे आणि एकत्र जीवनाबद्दलचे विचार वरवरचे असू नयेत. अन्यथा, असे नाते रिलेशनशिपमध्ये पोहोचले किंवा त्याच्याही पुढे जाऊन वैवाहिक जीवनापर्यंत पोहोचले तरी त्यानंतर अनेक गोष्टी न पटल्यामुळे कोणत्याही क्षणी नाते तुटण्याचा धोका नेहमी राहतो.
याशिवाय, जर तुम्ही प्रौढ असाल, विवाहित असाल आणि तुमचा घर-संसार नीट सुरू असेल, तर तुम्ही आणखी कोणत्या रिलेशनशिपमध्ये न पडलेले चांगले. नाहीतर, तुमच्या वागणुकीमुळे भविष्यात तुम्हाला आणि तुमच्या नात्यातील अनेकांना निश्चितपणे त्रास होऊ शकतो. गंभीर समस्या उभ्या राहू शकतात.
हेही वाचा - Chanakya Niti : हे 4 लोक घरात असतील तर जीवन बनेल मृत्यूची मगरमिठी! चाणक्य म्हणतात, तिथे मुळीच थांबू नका
(Disclaimer : ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. जय महाराष्ट्र याला दुजोरा देत नाही.)