Monday, September 01, 2025 07:15:30 AM

शिवनेरीवर रंगणार शिवजन्मोत्सव

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 17 ते 19 फेब्रुवारीला भव्य सोहळा

शिवनेरीवर रंगणार शिवजन्मोत्सव

शिवजयंतीनिमित्त पुण्यात 'हिंदवी स्वराज्य महोत्सव 2025'चे आयोजन

पुणे : छत्रपती शिवरायांच्या 395व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग, पर्यटन संचालनालय व पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर, शंकरराव बुट्टे-पाटील विद्यालय मैदानाच्या प्रांगणात येत्या 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान 'हिंदवी स्वराज्य महोत्सव 2025'चे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सोहळ्याचे उद्घाटन होणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या शिवजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने महाराष्ट्राची संस्कृती, कला, लोककला आणि परंपरा दाखवणाऱ्या विविध कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. या महोत्सवासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार, सहकार आणि नागरी विमान वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या महोत्सवांतर्गत राज्यातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना चालना देण्यासाठी विविध बचतगटांची उत्पादने व खाद्यपदार्थाच्या स्टॉलचे प्रदर्शन लावण्यात येणार आहे. त्याशिवाय महाराष्ट्राच्या जिद्दीचे प्रतीक असलेली शिवनेर महोत्सव बैलगाडा शर्यत घेण्यात येणार असून कबड्डी स्पर्धाही रंगणार आहे. शिवस्पर्श शिवसह्याद्री, छत्रपती शिवरायांची महाआरती आणि भव्य शोभायात्राही आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यक्रमानिमित्ताने जुन्नर तालुक्यातील गुणवंत कलाकार शिवकालीन खेळांची प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. त्याशिवाय छत्रपती शिवरायांची महाआरती व भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. कार्यक्रमाला नागरिक आणि शिवप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे यांनी केले आहे.

सरसेनापती उमाबाई दाभाडे प्रतिष्ठांनच्या वतीने शिवसह्याद्री ऐतिहासिक महानाट्याचा प्रयोग सादर करण्यात येणार आहे. तर 18 फेब्रुवारी रोजी स्वरांजली कलामंच, पुणे निर्मित 'गौरव माझ्या महाराष्ट्राचा' हा सांस्कृतिक कार्यक्रम रात्री 8 वाजता सादर करण्यात येणार आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर रात्री 12 वाजता छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात येणार आहे.


सम्बन्धित सामग्री