नवी मुंबई: मराठी भाषेच्या वापरावरून झालेल्या वादात एका 20 वर्षीय विद्यार्थ्यावर त्याच्या चार वर्गमित्रांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपवर मराठीत उत्तर देण्याचा आग्रह केल्याने हा वाद निर्माण झाला. या हल्ल्यात पीडिताच्या डोक्यावर हॉकी स्टिकने वार करण्यात आला. ही घटना वाशी सेक्टर 9 येथील आय.सी.एल.ई.एस. मोतीलाल झुनझुनवाला कॉलेजच्या बाहेर शनिवारी सकाळी 10:30 वाजता घडली. पीडित सुरज विठ्ठल पवार (वय 20), बी.एस्सी. आयटी तृतीय वर्षाचा विद्यार्थी आहे.
मराठी बोलण्यावरून वाद -
पोलिस तक्रारीनुसार, फैजान नाईक या वर्गमित्रासोबत व्हॉट्सअॅप ग्रुप ‘SYIT (ICLE)’ मध्ये मराठी वापरण्यावरून सुरज याचा वाद झाला होता. सुरजने ग्रुपमध्ये हलकाफुलका मराठी संदेश पोस्ट केला होता, त्याला फैजानने हिंदीत उत्तर दिले. त्यावर सुरजने 'मराठीत बोल, नाहीतर मनसे मागे लागेल', असा टोमणा मारला. यावरून वाद विकोपाला गेला.
हेही वाचा - जालन्यातील वसतिगृहात 8 वर्षीय मुलाची हत्या; 2 अल्पवयीन मुले ताब्यात
हॉकी स्टिकने मारहाण -
दरम्यान, दुसऱ्या दिवशी फैजान नाईक व तीन अज्ञात मित्रांनी कॉलेजबाहेर सुरजला अडवून मारहाण केली. फैजानने 'मी मराठीत का बोलू?' असे विचारत सुरजवर हॉकी स्टिकने डोक्यावर वार केले. इतर तिघांनीही त्याला मारहाण केली व शिवीगाळ केली. तथापी, जखमी सुरजने नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर त्याने वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
हेही वाचा - Sambhajinagar Crime: 'मी वर गेल्यावरच न्यायला या', आईला तो शेवटचा कॉल अन् जयाने संपवलं जीवन
पोलिसांनी हल्ला, गुन्हेगारी धमकी आणि दुखापत अशा विविध कलमांतर्गत सुरजवर हल्ला करणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. वाशी पोलिसांनी सांगितले की, आरोपींचा शोध सुरू आहे. तथापी, या प्रकरणात मनसेने उडी घेतली असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.