Uttarkashi Cloudburst Update: उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात अलीकडेच झालेल्या ढगफुटी आणि भूस्खलनामुळे मोठा विध्वंस झाला आहे. पुणे जिल्ह्यातील मंचर येथील 24 नागरिक उत्तकाशीत अडकले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडे याबाबत मदतीचे आवाहन केले आहे. सुप्रिया सुळे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'पुण्यातील मंचर येथील 24 नागरिक उत्तराखंडमध्ये अडकले आहेत. गेल्या 24 तासांपासून त्यांच्याशी कोणताही संपर्क झाला नसल्याने त्यांचे कुटुंब अत्यंत दुःखी आहेत. पुष्कर धामी आणि मुख्यमंत्री कार्यालयाला मी विनंती करते की त्यांनी दयाळूपणे हस्तक्षेप करावा आणि त्यांना लवकरात लवकर वाचवण्यास मदत करावी.'
सुप्रिया सुळे यांची एक्स पोस्ट -
राज्य आपत्कालीन ऑपरेशन्स सेंटर (एसईओसी) ने बुधवारी पुष्टी केली की महाराष्ट्रातील 51 पर्यटक उत्तरकाशीमध्ये अडकले आहेत. त्यापैकी 11 नांदेड जिल्ह्यातील आहेत आणि उर्वरित 40 जण राज्याच्या इतर भागातील आहेत. सर्वजण सुरक्षित असल्याचे वृत्त आहे. वृत्तानुसार, महाराष्ट्र सरकार उत्तराखंड राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि उत्तरकाशी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्रासोबत स्थलांतर प्रयत्नांचे समन्वय साधण्यासाठी काम करत आहे. अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाद्वारे देखील मदत पुरवली जात आहे.
हेही वाचा - Uttarkashi Cloudburst Update: उत्तरकाशीमध्ये 28 केरळवासीय पर्यटक बेपत्ता; शोधकार्य सुरू
दरम्यान, मंगळवार उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटीमुळे अचानक पूर आणि भूस्खलन झाले, ज्यामुळे धाराली आणि सुखी टॉप भागात मोठे नुकसान झाले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, चार जणांचा मृत्यू झाला आहे आणि 50 हून अधिक जण बेपत्ता आहेत. इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकांसह बचाव कार्य सुरू आहे.
हेही वाचा - हिमाचलमध्ये कैलास यात्रेच्या मार्गावर अचानक पूर; ITBP ने वाचवले 413 यात्रेकरूंचे प्राण
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राज्य आपत्कालीन ऑपरेशन्स सेंटर येथे आपत्ती व्यवस्थापन बैठक घेतली आणि हेलिकॉप्टरद्वारे पूरग्रस्त भागांचे निरीक्षण केले. तथापी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री धामी यांच्याशी फोनवरून संवाद साधला व धाराली भागातील परिस्थितीची माहिती घेतली. मदतकार्याचा आढावा घेतला आणि आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.