Jalna : मध्यरात्री भीषण दुर्घटना, जालन्यात वाळूखाळी दबल्याने ५ मजुरांचा जागीच मृत्यू
जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात शनिवारी पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास एक भीषण दुर्घटना घडली आहे. रात्री वाळू घेऊन आलेल्या टिप्परच्या चालकाने मजुर झोपलेल्या पत्र्याच्या शेडवरच वाळू टाकली. या घटनेत मजूर दबले गेले आणि पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेत एका १३ वर्षीय मुलीला आणि एका महिलेला वाचवण्यात यश आले आहे. घटनेनंतर जाफराबाद पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
पासोडी-चांडोळ रस्त्यावर एक पूल बांधण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी मजूर गोळेगाव, सिल्लोड तालुक्यातून आले होते. पुलाच्या कामासाठी आलेल्या या मजुरांसाठी पत्र्याच्या शेडची व्यवस्था करण्यात आली होती. शुक्रवारी रात्री मजुरांनी जेवण करून आपल्या शेडमध्ये झोप घेतली. शनिवारी पहाटेच्या सुमारास वाळू घेऊन आलेल्या टिप्पर चालकाने मजुरांच्या शेडवरच वाळू टाकली. त्यामुळे झोपेत असलेल्या पाच मजुरांवर वाळूचा प्रचंड दबाव आला आणि त्यांचा जागीच गुदमरून मृत्यू झाला.
ही घटना उघडकीस येताच परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. यात एका १३ वर्षीय मुलीला तसेच एका महिलेला लोकांना वाचवण्यात यश आले. या घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये बाप-लेकाचाही समावेश आहे.
हेही वाचा - शिंदेंच्या वाहनाला बॉम्बने उडवण्याची धमकी; दोन जण ताब्यात
दुर्घटनेती मृतांची नावे
गणेश काशिनाथ धनवई (वय ४०, गोळेगाव), भूषण गणेश धनवई (वय १६, गोळेगाव), सुनील समाधान सपकाळ (वय २०, पद्मावती), अन्य दोन मजूर (यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे) अशी मृतांची नावे आहेत.
हेही वाचा - कपाळावरील चंद्रकोरचे वैशिष्ट्ये तुम्हाला माहितीय का?
मृतांमध्ये बाप-लेकाचाही समावेश
गणेश धनवई आणि भूषण धनवई या बाप-लेकाच्या मृत्युमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघाताची माहिती मिळताच मृतांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांचा आक्रोश ऐकून संपूर्ण परिसर हळहळला. दरम्यान, या दुर्घटनेची गंभीर दखल घेत जालना जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर करण्यात येणार आहे.
टिप्पर चालक फरार
या दुर्घटनेनंतर टिप्पर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. अंधारात घाईघाईने वाळू टाकताना शेड असल्याची बाब त्याच्या लक्षात आली नसावी, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. परंतु त्याच्या निष्काळजीपणामुळे पाच निष्पाप मजुरांना आपला जीव गमवावा लागला. जाफराबाद पोलीस या फरार टिप्पर चालकाचा शोध घेत आहेत. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.