सांगली: सांगलीतील शिवशंभो चौकातील एका बंगल्यात काल घरगुती कार्यक्रम सुरू होता. दुपारच्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील एक जण कार्याक्रमासाठी आला. सोबत त्याने पकडून आणलेले मगरीचे पिल्लूही प्लॉस्टिकच्या बाटलीतून घेवून आला. ही बाब प्राणीमित्र कौस्तुभ पोळ निर्दशानास आली. वन्यजीवाची हेळसांड होत असल्याचा आरोप करत तातडीने सांगलीच्या वनविभागास कळवले. मात्र, वनविभागाने नेहमीप्रमाणे तीन तासानंतर घटनास्थळी धावले.

या दरम्यान, प्राणीमित्र आणि स्थानिक नागरीकांत बाचाबाचीही झाली. सायंकाळी ते पिल्लू कोल्हापूरच्या वनविभागास सुपुर्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. अखेर शहर पोलिसांच्या मध्यस्तीने हा गोंधळ मिटला.
कौस्तुभ पोळ हे ॲनिमल रहात संस्थेत कार्यरत आहेत.प्राणीमित्र म्हणून ते शहरात जखमी प्राण्यांचे रेस्क्यू करण्याचे काम करतात. काल ते एका कामानिमित्त कर्नाळवरून सांगलीत येत होते. त्यावेळी शिवशंभो चौकातील एका घरात कार्यक्रम होता. त्याठिकाणी एक व्यक्ती बाटलीतून मगरीचे पिल्लू घेवून जात असल्याचे पोळ यांना दिसून आला. त्यांनी तातडीने माजी वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील यांना कळवले. ते आणि प्राणीमित्र घटनास्थळी दाखल झाले. संबंधित व्यक्तीकडे चौकशी केली असता त्याने कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी येथील शेतातून मगरीचे पिल्लू रेस्क्यू केले होते. ते वनविभागाच्या ताब्यात न देता स्वतःकडे बाळगून तो थेट सांगलीत आला. मगरीचे पिल्लू लोकांसमोर दाखवत असल्याने प्राणीमित्रांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्या मगरीस तातडीने नैसर्गिक अधिवासात मुक्त केले पाहिजे, अशी मागणी प्राणीमित्रांची होती. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
