Wednesday, August 20, 2025 10:40:24 AM

गळ्यावर चटके अन् अमानुष मारहाण; सावत्र बापाने केला मुलीवर अत्याचार

बुलढाणा जिल्ह्यातील रुईखेड मायंबा येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. दहा वर्षांच्या मुलीवर तिच्या सावत्र बापाने अमानुष अत्याचार केला.

गळ्यावर चटके अन् अमानुष मारहाण सावत्र बापाने केला मुलीवर अत्याचार

विजय चिडे. प्रतिनिधी. बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील रुईखेड मायंबा येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. दहा वर्षांच्या मुलीवर तिच्या सावत्र बापाने अमानुष अत्याचार केला. पंधरा दिवसांपूर्वी, या नराधमाने त्या लहान चिमुकलीवर कधीही न विसरता येईल असं दुष्कृत्य केलं आहे. रक्तबंबाळ होईपर्यंत या नराधम सावत्र बापाने तिला क्रूरपणे छळले, ज्यामुळे ती बेशुद्ध पडली. विशेष बाब म्हणजे, आईने आपल्या मुलीला मदत करण्याऐवजी तिने आपल्या पोटच्या मुलीला धमकावले आणि घटनेची वाच्यता केल्यास मोठा परिणाम होईल अशी धमकी दिली. इतकंच नाही, तर या नराधम बापाने पुन्हा तिच्यावर अमानुष अत्याचार करण्यास प्रयत्न केला. 

हेही वाचा: बडोदा बँकेच्या व्यवस्थापकाने बँकेतच संपवलं स्वतःच जीवन

या घटनेमुळे, घाबलेल्या अल्पवयीन मुलीने पळ काढण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी, ती सिडको बस स्थानकावर उतरली आणि रडू लागली. तेव्हा तिथे असलेल्या एका तरुणाने तिला दिलासा देत तिची विचारपूस केली. तेव्हा, तिने आपल्या छत्रपती संभाजीनगर येथील मावशी सुषमा रावल यांचा फोन नंबर दिला. तेव्हा, या तरुणाने सुषमा यांच्याशी संपर्क साधून त्याने या चिमुकलीला नातेवाईकांच्या घरी सुपूर्द केले. यादरम्यान, अल्पवयीन मुलीने तिच्या मावशीला घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर, तिच्या मावशीने छत्रपती संभाजीनगर येथील शिवसेना जिल्हाप्रमुखांना या घटनेची माहिती दिली. यानंतर, या प्रकरणी तिच्या मावशीने पोलीस आयुक्तांची भेट घेतली. तसेच, अल्पवयीन मुलीने छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस आयुक्तांकडे आपला जाब नोंदवला. अल्पवयीन मुलीने दिलेल्या जबाबानंतर, या नराधम सावत्र बापावर पोलीस पुढील कारवाई करतील. 


सम्बन्धित सामग्री