Wednesday, August 20, 2025 12:56:26 PM

किडनी विकण्याच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांकडून दहिसरमधील तरुणाची 3 लाखांची फसवणूक

दहिसरमध्ये राहणाऱ्या 45 वर्षीय प्रशांत प्रफुल्ल नागवेकर यांच्यावर आर्थिक अडचणीचं मोठं ओझं होतं. दरमहा 15 हजार पगारावर काम करणारे नागवेकर अंधेरीतील एका खाजगी कंपनीत ऑफिस बॉय म्हणून काम करतात.

किडनी विकण्याच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांकडून दहिसरमधील तरुणाची 3 लाखांची फसवणूक
Cyber Crime

मुंबई: गरिबीच्या विळख्यात सापडलेल्या मुंबईतील एका व्यक्तीने आपल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी किडनी विकण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याच्या या निर्णयाचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांनी त्याच्याकडून तब्बल 2.95 लाख रुपये उकळले. या प्रकरणी दहिसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

सायबर गुंडांचा फसवणुकीचा नवी फॉर्म्युला - 

दहिसरमध्ये राहणाऱ्या 45 वर्षीय प्रशांत प्रफुल्ल नागवेकर यांच्यावर आर्थिक अडचणीचं मोठं ओझं होतं. दरमहा 15 हजार पगारावर काम करणारे नागवेकर अंधेरीतील एका खाजगी कंपनीत ऑफिस बॉय म्हणून काम करतात. त्यातलेच 10 हजार रुपये घरभाड्यासाठी आणि उरलेले घरखर्चासाठी जातात. यामुळे मुलाचं शिक्षण आणि स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न त्यांनी मनात दाबून ठेवलेलं होतं.

किडनी विकून लाखो रुपये कमवण्याची ऑफर - 

अनेक वर्षांपासून चाललेलं आर्थिक संकट पाहून त्यांनी किडनी विकून पैसा मिळवण्याचा निर्णय घेतला. गूगलवर सर्च करून मिळालेल्या मोबाईल नंबरवर त्यांनी संपर्क केला. त्या नंबरवरून उत्तर देणारे सायबर गुन्हेगार होते. त्यांनी नागवेकर यांना एक कोटी रुपये मिळतील अशी आश्वासनं देत फसवलं.

हेही वाचा - Pune Crime: एकट्या महिलेला गाठून भरपावसात तिच्यावर बलात्कार, नवऱ्याने घेतला संशय

शस्त्रक्रियेपूर्वी चाचण्यांच्या नावाखाली उकळले पैसे - 

गुन्हेगारांनी त्यांना सांगितले की, शस्त्रक्रियेपूर्वी काही चाचण्या आणि प्रक्रिया करण्यासाठी 2.95 लाख रुपये भरावे लागतील, जे विक्रेत्यालाच द्यावे लागतात. एवढे पैसे नसतानाही नागवेकर यांनी तीन ऑनलाइन कर्ज अ‍ॅप्समधून वैयक्तिक कर्ज घेतलं आणि त्यांच्या सांगण्यानुसार वेगवेगळ्या खात्यांत पैसे जमा केले. पैसे घेतल्यानंतर गुन्हेगारांनी अजून 1.30 लाख रुपयांची मागणी केली. त्यावेळी नागवेकर यांना शंका आली. जेव्हा त्यांनी कॉल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी दहिसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

हेही वाचा - डिजिटल बलात्कार म्हणजे काय? लखनऊमध्ये 4 वर्षांची निष्पाप मुलगी ठरली क्रूरतेची बळी

दरम्यान, दहिसर पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा सायबर गुन्ह्याच्या दिशेने तपास करत आहेत. तथापी, संबंधित बँक खात्यांचा मागोवा घेतला जात आहे. पोलिसांनी नागरिकांना अशा अवैध व्यवहारांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.


सम्बन्धित सामग्री