पुणे : डिपॉझिट न भरल्यामुळे गरोदर महिलेवर उपचार नाकारून तिच्या मृत्यृला जबाबदार असल्याचा ठपका सध्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आहे. यामुळे प्रकरणात डॉक्टरांवर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेल्या डॉ. सुश्रुत घैसास यांच्याविरोधात कारवाई होऊ शकते. येत्या दोन दिवसांमध्ये त्यांच्याविरोधात कठोर पावले उचलली जाऊ शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
पुणे प्रकरणातील डॉ सुश्रुत घैसासांविरोधात कारवाई होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी दोन अहवाल सादर झाले आहेत. उच्च स्तरीय समिती व धर्मदाय आयुक्तांचा अहवाल सरकारला प्राप्त झाला आहे. प्रथमदर्शनी दोन्ही अहवालात डॉ घैसास दोषी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. घैसास यांनी राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्यावर शासन कारवाईची टांगती तलवार आहे.
हेही वाचा : कोल्हापुर सत्र न्यायालयाकडून प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर
तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात राज्यात संतापाची लाट उसळली आहे. राज्यात प्रकरणाचे पडसाद उमटू लागल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीसाठी धर्मादाय आयुक्तांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल प्रधान सचिवांकडे सुपूर्द केला होता. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अहवालावर चर्चाही झाल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दोषी ठरवण्यात आले आहे. त्यामुळे आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर आता डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर सर्वप्रथम कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे दिसत आहे.
उच्चस्तरीय समितीने दिलेल्या अहवालानुसार डॉ. सुश्रुत घैसास आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी असल्याची माहिती आहे. धर्मादाय रुग्णालय असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या अल्प उत्पन्न गटातील तनिषा भिसे यांच्यावर तातडीने उपचार करणं ही रुग्णालयाची जबाबादारी होती, असे धर्मादाय कायदा सांगतो. मात्र,दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात या नियमाचा भंग झाल्याचे दिसत आहे, असे संबंधित अहवालात नमूद केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.