मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. वडिलांनंतर अल्पवयीन मुलाचा नैसर्गिक पालक आई असते, असं न्यायालयाने आपल्या निकालात म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर, न्यायालयाने 5 वर्षीय मुलीचा ताबा तिच्या आईकडे सोपवण्याचे आदेश दिले. ही मुलगी सध्या तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर आजी-आजोबांच्या संगोपनात राहत होती. यापूर्वी जिल्हा न्यायालयाने एप्रिलमध्ये पीडित महिलेचा अर्ज फेटाळून मुलीचा ताबा आजी-आजोबांकडेच राहावा, असा निर्णय दिला होता.
आईचा सहवास अधिक उपयुक्त -
दरम्यान, न्यायमूर्ती एस.जी. चपळगावकर यांनी दिलेल्या निर्णयात स्पष्टपणे सांगितले की, 'हिंदू अल्पवयीन आणि पालकत्व कायद्यानुसार, वडिलांनंतर आई नैसर्गिक पालक असते. आईकडे मुलीचा ताबा असणे हे नैसर्गिक आणि योग्य आहे, जोपर्यंत तिच्याकडून प्रतिकूलता किंवा दुर्लक्ष सिद्ध होत नाही. न्यायालयाने सांगितले की, पाच वर्षांच्या मुलीच्या हितासाठी तिच्या आईचा सहवास अधिक उपयुक्त आणि भावनिकदृष्ट्या सुरक्षित आहे.
हेही वाचा - मुंबईत 420 अनधिकृत शाळा; 126 शाळांवर फौजदारी खटले, शिक्षणमंत्र्यांचा मोठा खुलासा
काय आहे प्रकरण?
प्राप्त माहितीनुसार, या जोडप्याने 2018 मध्ये लग्न केले. परंतु जुलै 2024 मध्ये परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. त्यावेळी, महिलेने तिच्या एका वर्षाच्या मुलीचा ताबा पतीला देण्याचे मान्य केले, कारण त्यावेळी तिच्याकडे कोणतेही उत्पन्न नव्हते आणि ती तिच्या पालकांवर अवलंबून होती. जानेवारीमध्ये तिच्या पतीचे निधन झाले, त्यानंतर महिलेच्या पालकांनी अल्पवयीन मुलाचे पालक म्हणून नियुक्ती करण्यासाठी अर्ज दाखल केला. महिलेने याला विरोध केला आणि आजी-आजोबा वृद्ध होत आहेत आणि ते मुलाची काळजी घेऊ शकणार नाहीत, असा युक्तिवाद करत मुलीचा ताबा मागितला. तिने पुढे असा दावा केला की, ती आता चांगली कमाई करत असल्याने ती मुलीची काळजी घेऊ शकते.
हेही वाचा - मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली प्रादाविरुद्धची जनहित याचिका
न्यायालयाने दिला अंतिम निर्णय -
दरम्यान, न्यायालयाने स्पष्ट केले की, केवळ काही काळासाठी आजी-आजोबांनी संगोपन केले म्हणून नैसर्गिक आईचे हक्क नाकारले जाऊ शकत नाहीत. न्यायालयाने आजी-आजोबांना सुट्टीच्या दिवशी भेटीची मुभा देत, मुलीचा ताबा आईकडे सुपूर्त केला. तथापी, न्यायालयाने म्हटलं की, जेव्हा सुमारे पाच वर्षांच्या मुलीचा विचार केला जातो तेव्हा न्यायालये ही वस्तुस्थिती विसरू शकत नाहीत की आईच बाळाचा ताबा मिळवण्यासाठी सर्वोत्तम व्यक्ती असू शकते. नैसर्गिक आईने बाळाची काळजी आणि पाठिंबा देणे हे अतुलनीय आहे. तिची जागा इतर कोणीही घेऊ शकत नाही.