Ajit Pawar Meets Manikrao Kokate: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चेचा विषय ठरलेली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज झालेली भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये माणिकराव कोकाटे विधानसभेच्या सभागृहात ‘जंगली रमी’ खेळत असल्याचे दिसून आले. या व्हिडिओसह रोहित पवारांनी 'जंगली रमी पे आओ ना महाराज..' असे कॅप्शन दिले होते. तसेच सत्ताधारी राष्ट्रवादी गटाला भाजपाची परवानगी घेतल्याशिवाय काही करता येत नाही, असा घणाघातही त्यांनी केला होता.
राज्यात शेतकरी आत्महत्या, शेतीविषयक प्रश्न आणि कृषीमंत्र्यांच्या कामकाजावर उठलेले प्रश्न यामुळे या प्रकरणाला मोठे राजकीय वळण लागले होते. अनेक विरोधी नेत्यांनी कोकाटेंवर टीकेची झोड उठवली होती. दरम्यान, माणिकराव कोकाटे यांच्याबाबत निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे अजित पवार वारंवार सांगत होते. याच पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे यांनी आज अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान अजित पवार यांनी त्यांना समज दिल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रिपदावर राहून अशी वक्तव्यं करणं चुकीचं असल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. मात्र, कोकाटे यांना त्वरित राजीनामा द्यावा, असा दबाव असूनही अजित पवार मराठा मंत्र्यांचा बळी द्यायला तयार नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
आज राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक पार पडणार असल्याने कोकाटे यांच्या राजीनाम्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, सध्या तरी त्यांची राजीनामा देण्याची शक्यता मावळली आहे.