अकोला: अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. एका तरुणाने मैत्रीच्या आड लपवलेली घृणास्पद भावना उघड करत, लग्नासाठी नकार दिला म्हणून तरुणीवर थेट चाकूने हल्ला केला. ‘प्यार में धोखा’ या चित्रपटात पाहिल्यासारखी ही गोष्ट खरी घडलीय – आणि ती ही महाराष्ट्राच्या अकोला जिल्ह्यात!
संतोष डिवरे असं हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव असून, त्याने 22 वर्षीय वैद्यकीय नर्सवर चाकूने अनेक वेळा वार करत खून करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष आणि पीडित तरुणी यांच्यात गेल्या काही काळापासून मैत्री होती. त्या दोघांनी बोरगाव मंजू परिसरात एकत्र वेळ घालवण्याचं ठरवलं. फिरायला जातानाही दोघं एकत्र होते. पण या भेटीत काहीतरी विचित्र घडलं.
अचानकच संतोषने लग्नासाठी प्रस्ताव ठेवला. मात्र तरुणीने शांतपणे नकार दिला. हा नकार मात्र संतोषला सहन झाला नाही. त्याच्या मनात आधीच राग आणि असुरक्षिततेचा स्फोट उफाळून आला होता. वाद झाला आणि क्षणाचाही विचार न करता त्याने चाकू बाहेर काढला आणि तरुणीवर त्याच चाकूने हल्ला केला.
दरम्यान, जखमी अवस्थेत तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती सध्या स्थिर आहे. तिच्यावर योग्य उपचार सुरू आहेत.बोरगाव मंजू पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती ठाणेदार अनिल गोपाळ यांनी दिली आहे.
या घटनेमुळे अकोल्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, मैत्री आणि विश्वासावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.