छत्रपती संभाजीनगर: डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.मोठ्या प्रमाणात झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.ठाकरे यांना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.हेमलता ठाकरे यांनी लिहिलेल्या सुसाईड नोट समोर आली असून यात विद्यापीठाचे कुलगुरू विजय फुलारी, कुलसचिव प्रशांत अमृतकर यांनी छळ केल्याचा आरोप केला आहे.विविध कारणाने नोटीस काढून त्यांना छळले असा आरोप ठाकरे यांनी केला आहे.हेमलता ठाकरे यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नामुळे विद्यापीठात एकच खळबळ उडाली आहे.
सुसाईड नोट मध्ये नेमकं काय?
"आई, अमित, कल्पना आणि श्री तुम्ही मला सर्व माफ कराल अशी आशा करते. कारण मी जगाचा निरोप घेत आहे. खूप कंटाळा आलाय मला जगायचा. औरंगाबादमध्ये आल्यापासून खूप धावपळ झाली आहे. जगताना, संसार करताना आणि ऑफिसचे काम करताना खूप धावपळ झाली. संसार करताना जितका त्रास झाला नाही तितका त्रास मला माझ्या ऑफिसमुळे झाला. ऑफिसमधील सहकारी मला खूप त्रास देतात. त्यांच्या सततच्या त्रासामुळे मला आता जगण्याची इच्छा संपली आहे."
हेही वाचा:भंडारा जिल्ह्यातील रुग्णालयांच्या छतांमधून पाणी गळती; गरोदर महिलांसाठी धोक्याची घंटा
कुलगुरू विजय फुलारी,कुलसचिव प्रशांत अमृतकर यांच्यावर गंभीर आरोप
विजय फुलारी आणि प्रशांत अमृतकर यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी असे लिहिले आहे की, "आता तर ऑफिसमधले विजय फुलारी हे दुसऱ्या विद्यापीठातले एक सर आहेत. ते कुलगुरू म्हणून आमच्या विद्यापीठात आले आहेत. फुलारी सर आणि आमच्या विद्यापीठातले एक प्राध्यापक प्रशांत अमृतकर या दोघांनी मिळून मला गेल्या काही महिन्यांपासून खूप त्रास दिला आहे. आई आणि बाबा, तुम्ही मला सतत सांगत होतात की सत्य वागायचे, सत्य बोलायचे, कुणी कितीही त्रास दिला तरी ते सहन करायचे, आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असे कधी वागायचे नाही. तुम्ही दिलेल्या संस्कारामुळे मी नेहमी चांगलीच वागले. पण तुमच्या या संस्कारामुळे माझे हात बांधले होते. पण या दोन्ही अधिकाऱ्यांनी मिळून मी ऑफिसच्या साहित्य चोरले, असा आळ माझ्यावर घेतला. हा आळ घेऊन माझ्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली. हे सर्व प्रकरण माझ्या मनाला खूपच लागले आहे. माझ्यावर घेतलेला आळ घेऊन यापुढे मी जगू शकत नाही. आई माझ्यानंतर माझ्या श्री ची तू काळजी घेशील. तू जिवंत असेपर्यंत तुझ्याजवळ त्याला ठेव. तू असे केलेस तर मला बरं वाटेल. त्याला माझी उणीव भासू देऊ नकोस."