छत्रपती संभाजीनगर: 20 वर्षीय विवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन करुन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरातील गंगापूर तालुक्यातील देरडा गंगापूर गावातील आहे. जया पवन सोनावणे असे मृत विवाहितेचे नाव आहे.
पतीच्या प्रेमप्रकरणामुळे केली आत्महत्या
सासरच्या जाचाला कंटाळून 20 वर्षीय विवाहित तरुणीने स्वत:ला संपवलं आहे. जयाचे चार वर्षांपूर्वी पवन लक्ष्मण सोनावणे याच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस तिला चांगली वागणूक दिली. परंतु पती पवन याचे त्याच्या आते बहिणीशी प्रेमसंबंध होते. जोपर्यंत जयाने माहेरी काही न सांगता हा प्रकार सहन केला. तोपर्यंत तिला चांगले वागवले गेले. मात्र पवनचे प्रेमसंबंध वाढत गेल्याने जयाला असहाय्य झाले आणि तिने माहेरी फोन करुन सगळा प्रकार सांगितला. या प्रकारानंतर जयाचे पती पवन सोनावणे, सासरे लक्ष्मण सोनावणे आणि सासू मीरा सोनावणे यांच्यात वाद झाले.
हेही वाचा: Sambhajinagar: ऐन पावसाळ्यात 79 टँकर सुरू; अजूनही 49 गावांना टंचाईच्या झळा
'मी वर गेल्यावरच न्यायला या'
सासरच्यांकडून होणार छळ दिवसेंदिवस वाढत होता. या त्रासाला कंटाळून जयाने अनेकदा माहेर घेऊन जाण्याची विनंती केली. दोन दिवसांपूर्वीच जयाने तिची आई, भाऊ आणि सावत्र भावाला फोन केला होती. यावेळी आता माझी सहनशक्ती संपली आहे. पती पवनचे प्रेमसंबंध दिवसेंदिवस वाढत आहेत. आता इथे राहणे मला शक्य नाही असे जयाने फोनवर माहेरच्यांना सांगितले. त्यावर दोन दिवसात न्यायला येतो असे भावाने सांगितले. 21 जुलै रोजी जयाने आईला फोन केला होता. त्यावेळी मी वर गेल्यावरच न्यायला या असे सांगून जयाने आईचा फोन कट केला. यावेळी ती खूप त्रासलेली होती.
पती, सासू आणि सासऱ्यांवर गुन्हा दाखल
दरम्यान त्याच दिवशी सायंकाळी नातेवाईकांनी जयाने विष प्राशन केल्याची माहिती दिली. या प्रकरणी पती, सासरे आणि सासू यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिल्लेगाव पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे.