Wednesday, August 20, 2025 01:04:11 PM

नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या ठिय्या आंदोलनाला अखेर यश

अकोल्यात ठाकरे गटाच्या ठिय्या आंदोलनानंतर प्राधिकरणाच्या शाखा अभियंत्याचे निलंबन; शरीरसुख मागणी प्रकरणात कारवाई; आमदार देशमुखांनी विधानसभाध्यक्षांवरही गंभीर आरोप केला.

 नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या ठिय्या आंदोलनाला अखेर यश

अकोला: ठाकरे गटाच्या आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या ठिय्या आंदोलनाला अखेर यश आलं आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात झालेल्या एका महिलेकडून शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपांनंतर, आमदार देशमुख यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला होता.

गेल्या पाच तासांपासून सुरु असलेल्या या ठिय्या आंदोलनानंतर अखेर प्राधिकरण विभागाने कारवाई केली असून, शाखा अभियंता राजेंद्र इंगळे यांना निलंबित करण्यात आले आहे. तर उपविभागीय अधिकारी दत्तात्रये कपिले यांच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू असून, त्याचा प्रस्ताव अमरावती विभागाकडे पाठवण्यात आला आहे.

हेही वाचा:शिवसृष्टीच्या भूसंपादनात भ्रष्टाचाराचा आरोप; माजी आमदार वैभव नाईक यांचा सरकारवर हल्लाबोल

आंदोलनामागील कारण

मूर्तिजापूर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात कंत्राटी स्वरुपात काम करणाऱ्या एका महिला कॉम्प्युटर ऑपरेटरकडून शरीरसुखाची मागणी करण्यात आल्याचा आरोप या दोन अधिकाऱ्यांवर आहे. या प्रकारानंतर संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करून कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार देशमुख यांनी केली होती.

या मागणीसाठी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसह आमदार देशमुख यांनी प्राधिकरण विभागाचे मुख्य अभियंता गव्हाणकर यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन सुरु केलं होतं. आंदोलनादरम्यान मोठ्या संख्येने ठाकरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. अखेर राजेंद्र इंगळे यांच्या निलंबनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

हेही वाचा:प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणी मराठा समाज आक्रमक

विधानसभा अध्यक्षांवरही आरोप

आंदोलनादरम्यान आमदार नितीन देशमुख यांनी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरही गंभीर आरोप केले. 'या प्रकरणी आपण लक्षवेधी सूचना द्यावी अशी मागणी केली होती, मात्र विधानसभाध्यक्षांनी मुद्दाम लक्षवेधी न घेतल्याचा आरोप त्यांनी केला. विधानसभाध्यक्ष ‘मॅनेज’ झाले असल्याचा आरोपही देशमुख यांनी यावेळी केला.' त्यांनी स्पष्ट सांगितलं की, 'अशा आरोपी अधिकाऱ्यांची पाठराखण होत असल्यानेच पीडितेला न्याय मिळत नाही. म्हणूनच आपण आज अधिवेशनात न जाता अकोल्यात बहिणीसाठी ठिय्या आंदोलन केलं.'

आरोपी अधिकाऱ्यांच्या पाठिशी स्थानिक आमदार?

दरम्यान, या प्रकरणात पीडित महिलेनेही मोठा आरोप केला आहे. आरोप असलेल्या दत्तात्रये कपिले यांच्यामागे मूर्तिजापूर मतदारसंघाच्या आमदाराचे पाठबळ असल्याचं तिने सांगितलं आहे. आपल्याला वारंवार तक्रारी करूनही न्याय मिळत नव्हता, कारण पैशाच्या जोरावर आरोपींची पाठराखण होत असल्याचा आरोप पीडित महिलेने केला. या सर्व घडामोडींनी अकोल्यात खळबळ उडाली असून, ठाकरे गटाच्या आंदोलनामुळे प्रकरणात हालचाल झाल्याचं चित्र आहे.


सम्बन्धित सामग्री