मुंबई: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. पक्षबांधणी, नव्या संधींचा शोध आणि जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा सक्रिय करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत महत्त्वपूर्ण सल्ले दिले.
वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पार पडलेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, 'निवडणुका जवळ आल्या आहेत, आता वैयक्तिक मतभेद, गटबाजी किंवा हेवेदावे यांना थारा देऊ नका. एकत्र या, पक्षासाठी आणि मराठी अस्मितेसाठी पुन्हा मैदानात उतरा.'
या बैठकीत त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) यांच्याशी युतीच्या शक्यतेवर भाष्य करत कार्यकर्त्यांच्या मनातील प्रश्नांना उत्तर दिले. 'जर 20 वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र एका मंचावर येऊ शकतो, तर मग तुम्ही एकमेकांशी का भांडताय? पक्षाच्या हितासाठी एकत्र काम करा, कोणत्याही वादात अडकू नका,' असे त्यांनी ठणकावून सांगितले.
हेही वाचा: महायुती सरकारच्या निर्णयांची यू-टर्न मालिका; सहा महिन्यांत 7 निर्णयांचा पलटवार
राज ठाकरेंनी उपस्थितांना आगामी निवडणुकीसाठी ‘मुलभूत तयारी’ करण्याचे आदेश दिले. बुथ पातळीवर मतदार यादीची शुद्धता तपासणे, नव्या मतदारांची नोंदणी करणे, तसेच बनावट नावे शोधून काढणे अशा मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे त्यांनी सुचवले.
या बैठकीत एक विशेष मुद्दा होता; जुन्या निष्क्रिय कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात सक्रिय करणे. 'जे काही कारणास्तव पक्षाच्या कामातून दूर गेले, त्यांच्याशी संपर्क करा, त्यांना समजावून पुन्हा जोमाने कामात सामील करा,' असे आदेश राज ठाकरेंनी दिले.
मराठी भाषेचा मुद्दाही यावेळी चर्चेत आला. 'मराठीचा अभिमान ठेवा, पण कोणावरही द्वेषभावना बाळगू नका. आम्ही हिंदीचा विरोध करत नाही, पण मराठीचा सन्मान राखावा लागेल,' असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे यांच्या या बैठकीनंतर मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्यांनी युतीबाबत स्पष्ट सांगितले की, अंतिम निर्णय योग्य वेळेवरच घेतला जाईल आणि तो निर्णय पूर्ण पक्षहितासाठीच असेल.
या बैठकीमधून स्पष्ट झाले की, राज ठाकरे निवडणुकांसाठी सज्ज आहेत आणि कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा ऊर्जा निर्माण करून मनसेला मजबूत स्थानावर नेण्यासाठी कटिबद्ध आहेत. आता पहावं लागेल की, आगामी महापालिका निवडणुकांमध्ये या नव्या रणनीतीला कितपत यश मिळतं.