सोलापूर – सोलापूर वन विभागाने मोठी कारवाई करत घोरपडीच्या गुप्तांगांची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे. सोलापूर रेल्वे स्थानकात 2 मार्च रोजी घोरपडीचे गुप्तांग विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर वन विभागाने बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला आणि आरोपींना रंगेहाथ पकडले.
वन विभागाने केलेल्या धडक कारवाईत 151 घोरपडींची गुप्तांगे जप्त करण्यात आली असून, आंतरराष्ट्रीय बाजारात यांची कोट्यवधी रुपयांची किंमत असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी विठ्ठल सुग्रीव पाटोळे (वय 29), सुग्रीव रंगनाथ पाटोळे (वय 60, दोघे रा. पिंपळा, ता. वडवणी, जि. बीड) आणि बाळासाहेब लक्ष्मण डोरले (वय 34, रा. चिखली, जि. बीड) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.सोलापूर रेल्वे स्थानकावर आरोपी घोरपडीचे गुप्तांग विक्रीसाठी एका चारचाकी गाडीतून आले होते. ठरल्याप्रमाणे गुप्त खबऱ्याने त्यांना ओळख दिली आणि तत्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले. झडती घेतल्यावर तब्बल 151 घोरपडींची गुप्तांगे जप्त करण्यात आली.

1972 च्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार कठोर शिक्षा
घोरपड हा वन्यजीव संरक्षण कायदा 1972 च्या शेड्युल-1 मध्ये समाविष्ट असलेला संरक्षित प्राणी आहे. या प्राण्याची शिकार व विक्री करणे कायद्याने गुन्हा असून, दोषी आढळल्यास 10,000 रुपयांचा दंड आणि 7 वर्षांची सक्तमजुरी अशी शिक्षा आहे.
हेही वाचा : Himani Narwal Murder Case: हिमानी नरवाल यांच्या मारेकऱ्याला अटक; चार्जिंगच्या वायरने गळा दाबून केली हत्या, खूनामागचं कारणही आलं समोर
तामिळनाडू कनेक्शन – तस्करीचा मोठा कट उघड!
या प्रकरणाच्या तपासात तामिळनाडू कनेक्शन समोर आले आहे. तामिळनाडूत घोरपडीच्या अवयवांची विक्री करताना काही संशयित अटक करण्यात आले असून, त्यांच्याकडून सोलापूर व बीड जिल्ह्यांशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळाली आहे.
सोलापूर वन विभागाचे अधिकारी म्हणाले की, “वन्यजीव तस्करांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. अशा प्रकरणांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.