भंडारा: गणेशोत्सवाच्या काळात गौरी किंवा गौराई पूजण्याची परंपरा आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात विशेषतः पूर्व विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रचलित आहे. गौराई ही स्त्रीशक्तीचे, मंगलकार्याचे आणि समृद्धीचे प्रतिक मानली जाते. गणेश चतुर्थीनंतर तिसऱ्या दिवशी गौराईची स्थापना घरोघरी केली जाते. मात्र भंडाऱ्यात एक अनोखी प्रथा पाहायला मिळाली. तिथे गौरपूजेनंतर गणपतीचे आगमन होते. म्हणजेच गौरीचे विसर्जन केल्यानंतर गणपती बसवला जातो.
गौराईला पान, फुले आणि साडी नेसवून सजवले जाते. गौराईला बहिण, सखी किंवा कुटुंबातील सदस्याप्रमाणे सन्मान दिला जातो. महिलावर्ग खास करून गौराईची पूजा, कथा व पारंपरिक गाणी गातात. गौराईचे मोठ्या थाटामाटात घरी स्वागत केले जाते. पहिल्या दिवशी गौरीचे आगमन होते. त्या दिवशी तिला भाजी भाकरीचा नैवैद्या दिला जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचे पूजन केले जाते. पूरळपोळीसह विविध पंचपक्वान करुन तिचे पूजन केले जाते. महाराष्ट्रत गौराई आल्यावर महिलावर्गात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो.
हेही वाचा: Rushi Panchami 2025: ऋषीपंचमी कशी साजरी केली जाते, पूजा, महत्त्व, जाणून घ्या..
इतिहासानुसार गौराई पूजेचा उगम हा शेतीप्रधान संस्कृतीशी जोडलेला आहे. पूर्वी शेतात पीक चांगले यावे. कुटुंबात ऐश्वर्य, सौख्य आणि मंगलमय वातावरण नांदावे या हेतूने गौराईची स्थापना केली जात असे. स्त्रीशक्ती, पावित्र्य व कुटुंब ऐक्य यांचा गौरव करण्यासाठी ह्या परंपरेला सुरुवात झाल्याचे मानले जाते. गणपतीसोबत गौराईचे आगमन म्हणजे स्त्री-पुरुष शक्तीचे एकत्र पूजन आणि जीवनातील संतुलनाचे प्रतिक मानले जाते.