मुंबई: मुंबईतील कांदिवली परिसरातील केईएस इंटरनॅशनल स्कूलच्या अधिकृत ईमेल आयडीवर 30 जून रोजी सकाळी 6:55 वाजता शाळेत बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी देणारा मेल प्राप्त झाला. यामुळे शाळेच्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, खबरदारीचा उपाय म्हणून विद्यार्थ्यांना तात्काळ घरी पाठवण्यात आलं आहे.
शाळा प्रशासनाने सकाळी 8:55 वाजता कांदिवली पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सकाळी 10:00 वाजता बॉम्ब शोध पथक आणि 10:15 वाजता त्वरित प्रतिसाद पथक शाळेत दाखल झालं. सध्या संपूर्ण परिसराची कसून झडती घेतली जात आहे. धमकी देणारा मेल कोणी व कोठून पाठवला याचा तपास सुरू आहे. विशेष म्हणजे, याच शाळेला यापूर्वीही अशाच स्वरूपाच्या धमक्या मिळाल्या होत्या, मात्र कोणतंही स्फोटक पदार्थ आढळून आला नव्हता.
या घटनेच्या काही दिवस आधीच, 25 जून 2025 रोजी नालासोपाऱ्यातील श्रीपस्थळ परिसरातील दोन शाळांना राहुल इंटरनॅशनल स्कूल आणि मदर मेरी ज्युनिअर कॉलेज अशाच प्रकारचा धमकीवजा मेल प्राप्त झाला होता. हा मेल सकाळी 4:26 वाजता आला असून, त्यामध्ये लिहिलं होतं, 'आम्हाला कुणालाही मारायचं नाही, पण इमारतीचं नुकसान करणार आहोत. दोन वाजेपर्यंत शाळा खाली करा. 800 किलो आरडीएक्स शाळेत ठेवले आहे.'
या दोन्ही घटनांमुळे पालक वर्गात भीतीचं वातावरण आहे. पोलिसांकडून नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सायबर पोलिसांकडून धमकी मेलचा स्त्रोत शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे
हेही वाचा: राम मंदिराच्या काही कारणामुळे नालासोपाऱ्यातील दोन शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी