संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले आहे. मुंबईला पावसाचा मोठ्या प्रमाणात तडाखा बसल्याचे दिसून येत आहे. या पावसामुळे विक्रोळीतील पार्कसाईट या डोंगराळ परिसरात दरड कोसळली. पार्कसाईट परिसरातील डोंगरावर मोठी झोपडपट्टी आहे. याठिकाणी दरड कोसळण्याची भीती अनेकदा व्यक्त केली जात होती. या दुर्घटनेत मिश्रा कुटुंबीयांची घर दरडीखाली गाडले गेले. यामध्ये मिश्रा कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर चौघांवर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले :
बचावकार्यानंतर मिश्रा कुटुंबीयांना दरडीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. मात्र, सुरेश मिश्रा (वय 50) आणि शालू मिश्रा ( वय 19) या बापलेकीचा रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर आता पालिकेकडून दरड कोसळलेल्या आजुबाजूच्या भागातील घरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. आज हवामान खात्याने मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे डोंगराची माती भुसभुशीत होऊन आणखी एखादी दुर्घटना घडू नये, यादृष्टीने पालिकेकडून खबरदारी घेतली जात आहे.
लोकल 10 ते 15 मिनिटं उशीराने
मुंबईतील मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतूकीला फटका बसला आहे. मध्य रेल्वेमार्गावरील विद्याविहार आणि कुर्ला या स्थानकांदरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे लोकल आता 10 ते 15 मिनिटं उशीराने धावत आहेत.