विजय चिडे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मोसंबीचे माहेर घर म्हणून सर्वदूर नावलौकिक आहे. अशातच पैठण तालुक्यातील प्रसिद्ध व गोड रसेली मोसंबीला यंदाच्या पाणी टंचाईचा फटका बसला आहेत. पाण्याअभावी पाचोड परिसरातील शेतकर्यांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. यंदा मोसंबीसह अन्य फळबागा जगविणे अत्यंत जिकिरीचे ठरणार असून एप्रिल महिन्यातच विहिरी व कूपनलिका कोरड्या पडलेल्या दिसत आहेत. यामुळे मोसंबीसह इतर बागांचे मोठ्या प्रमाणात कधी न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. यामुळे मोसंबीचे सहन करण्याची वेळ शेतकर्यांवर येऊन ठेपली आहे.
पैठण तालुक्यात 15 हजार हेक्टर मोसंबी फळबागांची लागवड आहे. परंतु यंदा भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून परिसरातील फळबागा संकटात सापडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पैठण तालुक्यातील पाचोडसह परिसरात दुष्काळामुळे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून परिसरातील फळबागा संकटात सापडल्या आहेत. यंदा पाचोड, आडुळ, कडेठाण, विहामांडवा, दावरवाडी, बालानगर,मुरमा,कोळीबोडखा,थेरगाव,लिबंगाव, हार्षी, दादेगाव,केकत जळगाव, रांजनगाव, आडगाव,आंतरवाली खाडी, पाचोड खुर्द, कडेठाण परिसरात पंधरा-वीस वर्षांपासून कमी होत चाललेले पर्जन्यमान त्यामुळे हा परिसर वाळवंटाच्या दिशेने वाटचाल करत असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. एकेकाळी मोसंबी बागायतदारांचे क्षेत्र म्हणून नावलौकिक पैठण तालुक्याची ओळख होती. मोसंबीचे माहेर घर म्हणून ही पैठणला ओळखले जात आहे. या परिसरात जवळपास 1960 ते 1970 पासून मोसंबीच्या बागा आहेत. परंतु मागील काही वर्षांपासून निसर्गाने साथ न दिल्याने कित्येक मोसंबीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. ज्या काही शेतकऱ्यांनी आतापर्यंत कशा-बशा मोसंबीच्या बागा जतन केल्या होत्या. परंतु यावर्षी भयंकर दुष्काळी परिस्थिती उदभवल्याने भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे मागील चार ते पाच महिन्यांपूर्वी ज्या मोसंबीच्या बागा हिरव्यागार दिसत होत्या. त्या आजच्या घडीला पूर्णतः जळून गेल्या आहेत. पाणी पातळी दिवसेंदिवस कमी होत चालल्याने पाणी टंचाई भीषण रुप धारण करत आहे. परिणामी उभ्या फळबागा कोमेजून जात असल्याने शेतकऱ्यांना जड अंत:करणाने त्यावर कुऱ्हाडीचे घाव घालावे लागत आहेत. अनेक वर्षापासून लहान मुलांप्रमाणे सांभाळलेल्या जोपासलेल्या बागा तोडताना शेतकऱ्यांचे हात थरथर कापत आहेत.
हेही वाचा : लग्न 10 दिवसांवर असताना नवरदेवाने ठोकली धूम; सासूबाईला घेऊन पळाला
पाण्याअभावी शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे. यंदा मोसंबीसह अन्य फळबागा जगविणे अत्यंत जिकिरीचे ठरणार असून समाधानकारक पाऊस न झाल्याने विहिरी तलाव व कूपनलिका कोरडेठाक पडलेल्या आहेत. यावर्षी कमी पाऊस झाल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे मोसंबीच्या बागा आता पाण्याअभावी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मोसंबीच्या फळबागांची परिस्थिती पाण्याअभावी चिंताजनक असल्याने शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी करण्यात येत आहे. शासन फळबागा वाचवण्यासाठी ठोस पाऊल उचलणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
'350 मोसंबीच्या झाडावर कुऱ्हाड'
मी मागील दहा वर्षांपूर्वी दोन एकरात मोसंबीच्या 350 झाडांची लागवड केली होती. दोन तीन वर्षच चांगले उत्पन्न मिळाले आहे. मागील चार-पाच वर्षांपासून पावसाचा मेळ नाही, यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने विहीर आटली. त्यामुळे माझी 350 मोसंबीची झाडे पाण्याअभावी वाळू लागली आहेत. त्यामुळे या संपूर्ण मोसंबीच्या बागेवर मी कुऱ्हाड चालवत आहे. तळहाताप्रमाणे जपलेली मोसंबी आज आम्हाला तोडताना दुःख होत आहे. शासनाने फळबाग वाचवण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे असे अजिनाथ बढे या शेतकऱ्याने म्हटले आहे.
मोसंबीच्या बागा, जगायच्या कशा हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला
यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने बहुतांश पाझर तलाव कोरडेठाक पडलेले आहेत. विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे मोसंबीच्या बागा जगायच्या कशा हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. परिसरातील काही शेतकरी विकत पाणी घेऊन फळबागा वाचवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करीत आहे. परंतु अजून तीन महिने जाणार कसे या चिंतेत शेतकरी दिसत आहे.