मुंबई : वक्फ सुधारणा विधेयक 2025 ला लोकसभेने मंजुरी दिली. यावर विरोधी पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बुधवारी रात्री झालेल्या मतदानात 288 मतांनी विधेयकाला समर्थन मिळाले तर 232 खासदारांनी याला विरोध दर्शवला. मात्र लोकसभेत ठाकरे गटाने वक्फ दुरूस्ती विधेयकाला विरोध दर्शवला. यामुळे ठाकरेंवर चहुबाजूंनी टीका होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारचा दिवस ठाकरेंसाठी दुर्दैवी असल्याचा हल्लाबोल ठाकरेंवर केला आहे.
ठाकरे गटाने घेतलेल्या भूमिकेमुळे बेगडी हिंदुत्व समोर आलं. वक्फ बोर्डला केलेल्या विरोधामुळे त्यांच्याही काही सहकाऱ्यांना मान खाली घालावी लागली. उबाठा गट गोंधळलेला आहे. नेतृत्वाला काही सुचत नाही. धरलं की चावतंय सोडलं की पळतंय अशी अवस्था ठाकरे गटाची झाली असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच बाळासाहेबांचा देशभक्त मुस्लिमांना पाठिंबा होता. ही भूमिका शिवसेना, भाजपची आहे आणि मोदींचीही आहे. देशाविरोधात कृत्य करणाऱ्यांना आमचा विरोध आहे. सातत्याने राहुल गांधीसोबत राहिल्याने त्यांना जिनांची आठवण येते आहे. आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असे शिंदे यांनी सांगितले.
'गोंधळलेला नेतृत्व असलं की पक्ष इतिहासात जातो'
एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. शिंदे म्हणाले, आजच्या पत्रकार परिषदेत स्वतःची अब्रू काढून घेतली. वक्फ दुरूस्ती विधेयकामुळे मूठभर लोकांच्या हातात असलेल्या कोट्यवधींच्या जमिनीला चाप बसेल. वक्फच्या मालमत्तेवर शाळा, कॉलेज आणि हॉस्पिटल होतील. मुस्लिमांनीही याचं स्वागत केलं आहे. एकीकडे मुस्लिम लांगुलचालनबद्दल बोलतायत आणि दुसरीकडे भाजपवर आरोप करतायत. गोंधळलेला नेतृत्व असलं की पक्ष इतिहासात जातो असे शिंदेंनी म्हटले आहे.
हेही वाचा : सत्ताधारी आमदाराचा पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आरोप
'गद्दार कोण? हे जनतेने दाखवून दिलं'
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर जोरदार बरसले आहेत. आम्ही बाळासाहेब आणि दिघे यांचे विचार घेऊन जातोय, कुठलीही तडजोड करणार नाही. त्यांच्या नावाचा शॉर्ट फॉर्म युटी (UT ) आहे. मग यूज आणि थ्रो म्हणायचं का? असा सवालही शिंदेंनी केला आहे. आमच्या चुकांमुळे तुमचे 20 निवडून आले. गद्दार कोण हे जनतेने दाखवून दिलं आहे. त्यांची भूमिका दुटप्पी आहे. एकदा त्यांनी सभात्याग केला होता. हिंदू आणि मुस्लिम मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम त्यांनी केलं असा घणाघात शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.